गिरे तो भी टांग उपर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST2021-07-27T04:31:46+5:302021-07-27T04:31:46+5:30
‘गिरे तो भी टांग उपर...’ या उक्तीचा अनुभव नंदुरबारात गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. नंदुरबार शहरासह परिसरात पावसाची संततधार ...

गिरे तो भी टांग उपर...
‘गिरे तो भी टांग उपर...’ या उक्तीचा अनुभव नंदुरबारात गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. नंदुरबार शहरासह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आहे. खड्डे पाण्याने भरले आहेत. त्यातच स्टंट करून दुचाकी चालविणाऱ्या युवकांची कमी नाही. असाच एक युवक स्पोर्ट बाईक घेऊन सुसाट जात होता. नेहमीच्या अविर्भावात जातांना पाणी भरलेल्या खड्ड्याचा अंदाज त्याला आला नाही. परिणामी त्याची दुचाकी त्या खड्डयात जोराने आदळली. परिणामी त्याचा तोल जाऊन तो थेट खड्ड्यात पडला. त्यामुळे जोराचा आवाज झाला. आजूबाजूला असलेल्यांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु आपली स्टंटबाजी अंगाशी आली, काही जणांना हसू आले, हे त्याच्या मनाला बोचले आणि पायाला इजा झालेली असतानाही तो ताडकन उठण्याचा प्रयत्न करून लागला. जणू मला काही झालेच नाही, असा अविर्भाव त्याचा होता. परंतु पायाची असह्य वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. तरीही त्याने कुणाचाही मदत न घेता तशीच दुचाकी उचलली आणि सुरू करून पुढे गेला. स्वत: किती जखमी आहे, हे पाहून त्याने लागलीच दवाखाना गाठला. तेथे निदान केल्यावर त्याचा पाय फॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. आता तो किमान तीन महिने बेडवरच राहणार आहे. स्टंटबाजीत फसला आणि पाय मोडून बसला, तरीही ‘गिरे तो भी टांग उपर करून’ तो स्वत: दवाखान्यात गेला आणि दुखणं वाढवून बसला असेच अनेकांच्या तोंडी शब्द निघाले...
-मनोज शेलार, नंदुरबार.