नंदुरबारकरांंची ‘सेस’ मधून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:36 IST2020-01-02T11:35:59+5:302020-01-02T11:36:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन उड्डाणपुल निर्मितीचा खर्चाच्या वसुलीकरीता नंदुरबारकरांवर लादलेला पेट्रोल व डिझेलवरील लिटरमागे प्रत्येकी एक रुपया ...

नंदुरबारकरांंची ‘सेस’ मधून सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन उड्डाणपुल निर्मितीचा खर्चाच्या वसुलीकरीता नंदुरबारकरांवर लादलेला पेट्रोल व डिझेलवरील लिटरमागे प्रत्येकी एक रुपया व ९० पैसे अधिभार अर्थात सेसची मुदत संपली आहे़ यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला असून शहरातील पेट्रोलपंपावर नियमित दरातील पेट्रोल-डिझेल मिळण्यास सकाळी सहापासून सुरुवात झाली आहे़
शहरातील व शहराबाहेर दोन उड्डाणपुलांना तत्कालीन आघाडी शासनाने आॅगस्ट २००३ मध्ये मंजुरी दिली होती. शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत १६ कोटी ४३ लाख रुपयांचा अंदाजित खर्च दोन्ही उड्डाणपुलांसाठी मंजूर करण्यात आला होता़ परंतू बांधकामासाठी बराच वेळ लागल्याने अंदाजित निधीपेक्षा अधिकचा खर्च झाला होता़ उड्डाणपुलांसाठी मंजूर निधीतच शहरातील दोन्ही उड्डाणपूल, पालिका हद्दीतील रस्ते सुधारणा आणि सार्वजनिक बांधकाम हद्दीतील रस्ते सुधारणा यांचा त्यात समावेश होता. उड्डाणपुलांसाठी अधिक खर्च झाल्याने विकासाच्या इतर योजना बारगळल्या होत्या़
रस्ते विकास महामंडळाने २००८ साली पूर्ण केलेल्या उड्डाणपुलांच्या बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी सुरुवातीला सहा ठिकाणी टोलनाके उभारुन वसुली सुरु केली होती़ या वसुलीला बराच विरोध झाल्याने अखेर ते बंद करून त्याऐवजी शासनाकडून शहरात आयात केल्या जाणाऱ्या पेट्रोलवर एक रुपया आणि डिझेलवर ९० पैसे अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात येऊन हा अधिभार अर्थात सेस वसुलीची मुदत ही २०१६ पर्यंत ठेवण्यात आली होती़ ही मुदत २०१६ पर्यंत असताना त्याला शासनाकडून वेळावेळी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली़ यावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानपरिषदेत लक्ष्यवेधी मांडून नंदुरबारच्या जनतेला दिलासा देण्याची मागणी केली होती़ शासनाकडून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच सेस वसुली होणार असल्याचे सांगण्यात आले होते़ नव्याने मुदतवाढीची कारवाई न झाल्याने अखेर ३१ डिसेंबर रोजी सेस संपुष्टात आला़ यामुळे उजाडलेल्या नवीन वर्षात नागरिकांना राज्यातील दरांप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेल मिळण्यास सुरुवात झाली आहे़
बुधवारी सकाळी सहा वाजेपासून पेट्रोलपंपावर दरांमध्ये बदल झाले़ पेट्रोल प्रतीलिटर ८१ रुपये ४२ पैसे तर डिझेलचे प्रतीलिटर दर हे ७० रुपये ८२ पैसे एवढे आहेत़ सेस नाहीसा झाल्याने प्रती लिटर डिझेलमागे ६० तर डिझेल मागे एक रुपया ७० पैसे कमी झाल्याचे पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात आले आहे़ पेट्रोल-डिझेलच्या बदलत्या दरांमध्ये यापुढे सेसआधारित दर लागू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़
शासनाने नंदुरबारातील दोन्ही उड्डाणपुलांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी टोलनाके सुरु केले होते़ शहरातील विविध सहा मार्गांवर हे टोलनाके कार्यान्वित होते़ परंतु टोलवसुलीसंदर्भात नागरिकांनी सातत्याने नाराजी व्यक्त केल्याने शासनाने टोलनाके आवरते घेतले होते़ याऐवजी खर्चवसुली साठी नंदुरबार शहराच्या हद्दीतील सर्व पेट्रोल व डिझेल पंपांवरून विक्री होणाºया पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर लिटरमागे पेट्रोलला एक रुपया आणि डिझेलला ९० पैसे अधिभार लावण्याचे घोषीत करण्यात आले होते. तब्बल १४ वर्षे ही वसुली सुरु होती़ अखेर डिसेंबर २०१९ ला ही वसुली थांबली आहे़