नवापुरातील १२ ग्रामपंचायतींवर गावीत-नाईक-गावीत यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 21:28 IST2021-01-10T21:28:51+5:302021-01-10T21:28:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यात यंदा १४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यातून सांगाळी व धुळीपाडा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने ...

नवापुरातील १२ ग्रामपंचायतींवर गावीत-नाईक-गावीत यांची नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यात यंदा १४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यातून सांगाळी व धुळीपाडा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने केवळ १२ ग्रामपंचायतीत निवडणूक होणार आहे. यातील अनेक वाॅर्ड बिनविरोधदेखील झाले आहे. नवापूर तालुक्यातील धनराट ग्रामपंचायतीतून विभक्त झालेल्या धुळीपाडा ग्रामपंचायतीवर भाजपचे भरत माणिकराव गावीत यांनी दावा केला आहे, तर दुसरीकडे सांगाळी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने माजी आमदार शरद गावीत यांच्या गटाने दावा केला आहे.
रायंगण व उमराण येथील प्रत्येकी एक वाॅर्ड आणि पळसून येथे दोन वॉर्ड बिनविरोध झाले आहे. यावर आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या गटाचा दावा आहे. १२ ग्रामपंचायतीत अनेक ग्रामपंचायतीत कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीवर भाजप तालुकाध्यक्ष भरत गावीत, आमदार शिरीष नाईक, माजी आमदार शरद गावीत यांची ग्रामपंचायत विजयी करण्यासाठी करडी नजर आहे. तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीत गावीत-नाईक-गावीत समीकरण होते. त्यांचा काहीअंशी प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायतीवर दावा मात्र करतात. उमेदवारी अर्ज माघारीनंतर २२९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तालुक्यातील धनराट, वडकळंबी, उकळापाणी, रायंगण, कोठडा, नांदवण, उमराण, चेडापाडा, बंधारपाडा, केळी, ढोंग, पळसून या १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे.
नवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बदलत्या काळानुसार निवडणुकीचे चिन्हही बदलत गेले. काळानुसार निवडणूक आयोगाने ९० नवीन चिन्ह दिली असली तरी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पारंपरिक चिन्हांना जास्त पसंती दिल्याचे चित्र आहे.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्षाने आपापले सर्वाधिक ग्रामपंचायत निवडून येण्याचा दावा केला असला तरी कोणत्याच पक्षाचे निवडणूक चिन्ह या निवडणुकीत दिसत नाही आणि ते येत्या काळात दिसणे शक्य नाही. मात्र कित्येक दशकापासून ओळखीचे असलेले निवडणूक चिन्ह घेतल्याचे चित्र तालुक्यातील सगळ्या भागात दिसत आहे. निवडणूक आयोगाने लॅपटॉप, पेनड्राइव्ह, हेडफोन, एसी, सीसीटीव्ही, क्रेन, संगणक, हेल्मेट, हेलिकॉप्टर, मशीन केक, गालिचा, ब्रेड टोस्टर यासारख्या आधुनिक काळातील निवडणूक चिन्हांना मान्यता दिली असली, तरी चिन्ह वाटपात उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
नवापूर आदिवासीबहुल भागातील मतदारांना आधुनिक चिन्हांची पुरेसी ओळख नसल्याने अनेक उमेदवारांनी सिलिंडर, कपाट, टीव्ही, कपबशी, फॅन, बस, शिलाई मशीन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले. दैनंदिन वापरातील वस्तूंची चिन्हे ग्रामीण भागातील जनतेच्या परिचयाची असल्याने उमेदवारांनी या चिन्हांना पसंती दिल्याचे चित्र आहे. बदलत्या काळाला अनुसरून निवडणूक प्रक्रिया जरी हायटेक झाली असली तरी निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा चिन्हांचे एक वेगळ आकर्षण ग्रामीण आदिवासीबहुल भागात दिसत आहे. हायटेक प्रसाराबरोबर विकास आणि उमेदवार जर हायटेक झाला तर खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना खर यश आलं, असे म्हणावे लागेल.
सध्या नवापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीचा प्रचार व प्रसार सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोप, शीतयुद्ध ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. काॅंग्रेस पक्षाचे आमदार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक व भाजपचे तालुकाध्यक्ष भरत माणिकराव गावीत, माजी आमदार शरद गावीत यांच्या नेतृत्वाखालील जास्तीत जास्त ग्रामपंचायती विजय करण्याचा संकल्प केला आहे. नवापूर तालुक्यातील या तिरंगी नेतृत्वापैकी १२ ग्रामपंचायतीवर विजयाचा बार कोणाच्या नावाने लागेल हे येणारा काळच सांगेल.