नंदुरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्स्प्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:46 IST2022-01-29T13:42:55+5:302022-01-29T13:46:10+5:30
रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीने अचानक पेट घेतल्यानं प्रवाशांमध्ये घबराट

नंदुरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्स्प्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण
नंदुरबार : नंदुरबारमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. गांधीधाम-पुरी एक्सप्रेस गाडीला नंदुरबार स्थानकाच्याजवळ अचानक आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे प्रवासी घाबरले.
रेल्वे प्रशासनाकडे कुठलीही उपाययोजना नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं. आग वाढत असल्याचं लक्षात येताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू झाले. काही वेळानं आग नियंत्रणात आली.
गांधीधाम-पुरी एक्सप्रेस गाडीच्या डब्याला लागलेल्या आगीमुळे जळगाव ते सुरत मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या दोन तास खोळंबल्या. प्रवाशांची गर्दी वाढली असून विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आग नेमकी का लागली? याचाही शोध सुरू आहे.