वाळू वाहतुकीचे महिनाभरात चार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:29 IST2020-02-10T12:28:53+5:302020-02-10T12:29:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवैध वाळू वाहतूक आणखी किती जणांचा बळी घेवून थांबणार असा प्रश्न आता जिल्हावासी उपस्थित ...

वाळू वाहतुकीचे महिनाभरात चार बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवैध वाळू वाहतूक आणखी किती जणांचा बळी घेवून थांबणार असा प्रश्न आता जिल्हावासी उपस्थित करीत आहेत. आधीच जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागलेली, त्यात भरधाव व क्षमतेपेक्षा अधीक भार वाहून नेणारे वाळूचे डंपर यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेवूनच चालावे लागत आहे. एवढे सर्व घडून देखील उपप्रादेशिक परिवहन विभाग, महसूल विभाग आणि पोलीसही बेफिकीरपणा दाखवत असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य जनता कमालीची संतप्त झाली आहे.
गेल्या महिनाभरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची उडविल्याने आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १० पेक्षा अधीकजण जायबंदी झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात अद्याप वाळू घाट लिलाव झालेले नाहीत. तापी नदीवरील गुजरात हद्दीतील वाळू घाटावरून वाळू भरून जिल्ह्यात वाळू आणली जात आहे. शिवाय जिल्ह्यातूनच नाशिक, मुंबईकडे वाळू पाठविली जात आहे. त्यासाठी मोठ्या आणि अवजड वाहनांचा वापर केला जात आहे. क्षमतेपेक्षा अधीक वाळू भरणे आणि बेदरकारपणे वाहने चालविणे हा या वाहतूकदारांचा हक्कच बनला आहे. कुणाच्याही जिवाची पर्वा न करता वाहने चालवून अशा वाहनचालकांनी सर्वांच्याच नाकीनऊ आणले आहे.
रस्त्यांची अवस्था बिकट
जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था आधीच बिकट आहे. एकही रस्ता सुस्थितीतील नाही. केवळ सहा महामार्ग मंजुर झाल्याच्या वल्गना लोकप्रतिनिधी गेल्या तीन वर्षांपासून करीत आहेत. त्यांच्या कामाचा पत्ता नाहीच परंतु आहे त्या रस्त्यांची दुरूस्तीबाबतही बोंब पाडली जात नसल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. खड्डेमय रस्ते वाहनचालकांना यातना देत आहेत. जेथे अर्धा ते एक तासांचे अंतर तेथे दीड ते दोन तास लागत आहेत. त्यात भरधाव आणि अवजड वाहनांची भर पडत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात गेल्या सहा महिन्यात प्रचंड वाढ झाली आहे.
अखेर नियंत्रण कुणाचे?
अवजड आणि वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर अखेर नियंत्रण कुणाचे? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. वाळू वाहतूक वैध की अवैध हे पहाणे महसूल विभागाचे काम आहे. त्यामुळे त्याबाबत आम्ही कारवाई करू शकत नाही असे पोलीस आणि आरटीओंचे म्हणने आहे. क्षमतेपेक्षा अधीक भार वाहतूक करणे यावर कारवाईचे अधिकार आमचे नाही, आरटीओ विभागाचे असे महसूलचे म्हणने आणि केवळ नियम तोडणे आणि भरधाव वाहने चालविणे यावर कारवाईचे अधिकार आमचे असे पोलिसांचे म्हणने आहे. यामुळे थेट कारवाई करणार तर कोण? सर्वच चिलम तमाखूचा हा खेळ प्रशासनात सुरू आहे. जिल्हाधिकारीही गांभिर्याने घेत नसल्यामुळे इतर विभागांनी हात वर केले आहेत. परिणामी पळवाटा काढत असे वाहनचालक आपली मनमानी सुरू ठेवत आहेत.
संयुक्त पथके नेमा...
कारवाईबाबत अशी चालढकल होत असल्यामुळे संयुक्त पथके नेमून अशा वाहनांना आणि त्यांच्या चालक, मालकांना वठणीवर आणले गेले पाहिजे. महसूल, आरटीओ आणि पोलिसांचे संयुक्त पथके नेमून जिल्हाभरात कारवाईचा धडाका सुरू केला तर त्यांच्यावर वचक राहील. केवळ कारवाईपुरते या पथकांची स्थापना न करता कायमस्वरूपी राहिले पाहिजे आणि दर महिन्याला त्यातील अधिकारी व कर्मचारी बदलले गेले पाहिजे तरच नियंत्रण शक्य आहे. अन्यथा जे चालू आहे ते नेहमीचेच राहणार हे स्पष्टच आहे.
महिनाभरात अवजड वाहनांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर तीन आठवड्यांपूर्वी पहाटे भरधाव अवजड वाळूच्या ट्रकने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कृषी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावर घडली होती. त्यात ट्रकचा सहचालकही ठार झाला होता. शिवाय प्रवेशद्वारही भुईसपाट झाले होते.
दुसरी घटना शनिवारी दुपारी लहान शहादानजीक घडली. भरधाव डंपरने धडक दिल्याने अॅपेरिक्षातील दोनजण जागीच ठार झाले. सहा जणांना जायबंदी व्हावे लागले.
तिसरी घटना गेल्या आठवड्यात साक्री रस्त्यावर मध्यवर्ती कारागृहाजवळ घडली. भरधाव डंपरने दुचाकीला उडविल्याने दोनजण गंभीर जखमी झाले होते.
चौथी घटना वळण रस्त्यावर घडली. तीन आठवड्यांपूर्वी ट्रक टर्मिनस समोर कारला धडक दिल्याने चारजण जखमी झाले होते. याशिवाय इतर लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.
जिल्ह्याच्या सिमेलगत परंतु गुजरात हद्दीत आणखी एक घटना घडली. भरधाव डंपरने कारला उडविल्याने अनरद, ता.शहादा येथील पती-पत्नी जागीच ठार झाले होते.
महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाळू भरलेले वाहन अडविल्यास वाहतूकदार एकत्र येवून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, हुज्जत घालतात. १५ दिवसांपूर्वी करण चौफुलीजवळ असाच प्रकार झाला होता. प्रकरण तहसील कार्यालयात गेले. तेथे झालेल्या हुज्जतीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
याचा अर्थ प्रशासनालाही आता कुणी जुमानत नाही हे यावरूच सिद्ध होते.
अपघातानंतर मुळ सूत्रधार बाजूला राहतात, वाहनचालकावर कारवाई होऊन प्रकरण निस्तारले जात असते.