खांडबाऱ्यातील गोडावूनमधून चार लाखांचा अवैध गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:47 IST2019-12-13T11:47:40+5:302019-12-13T11:47:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील खांडबारा येथून पोलीसांनी बंदी असलेला ४ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा एलसीबीच्या पथकाने ...

खांडबाऱ्यातील गोडावूनमधून चार लाखांचा अवैध गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील खांडबारा येथून पोलीसांनी बंदी असलेला ४ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला़ किराणा दुकानाच्या मागे असलेल्या गोडावूनमध्ये हा गुटखा लपवण्यात आला होता़
खांडबारा गावातील मुख्य बाजारपेठेत सुंदर भगवानदास दामेचा याच्या मालकीच्या किराणा दुकानात गुजरात राज्यातील गुटखा आणून त्याचा साठा करण्यात येऊन विक्री होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पथकाने बुधवारी खांडबारा येथे भेट देत दामेचा याच्या दुकानाची झडती घेण्यास सुरुवात केली होती़ यावेळी दुकानमालक दामेचा याने किराणा दुकान चालवून ‘गुजराण’ करत असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली होती़ दरम्यान पथकाने दुकानाच्या मागील बाजूस असलेले गोडावूनमध्ये तपास केला असता, त्याठिकाणी बंदी असलेला पान मसाला, गुटखा असा एकूण ४ लाख ३४ हजार २५८ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़
गोडावूनमध्ये २ लाख ४० हजार रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे १० खोके, ६० हजार रुपयांचे मिराज तंबाखूचे १० खोके, ६० हजार रुपये किमतीचा गुटखा यासह बंदी असलेला गुटखा आणि पानमसाल्याचे डबे आढळून आले होते़ पथकाने मुद्देमाल जप्त करत दुकानमालक सुंदर दामेचा व मुद्देमाल विसरवाडी पोलीसांना सोपवला़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, मनोज नाईक, मोहन ढमढेरे यांच्या पथकाकडून करण्यात आली़