फेसरिडींगद्वारे शिक्षकांच्या उपस्थितीवर राहणार लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:17 IST2020-03-02T11:17:44+5:302020-03-02T11:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली ...

फेसरिडींगद्वारे शिक्षकांच्या उपस्थितीवर राहणार लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली जाणार आहे. अशा शाळा या जीपीएसद्वारे मुख्यालयाला जोडल्या जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे दुर्गम भागातील शाळा नियमित सुरू राहणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुर्गम भागात कनेक्टीव्हिटीची अडचण लक्षात घेता हा उपक्रम कितपत यशस्वी होईल हा प्रश्नच आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती व शाळा नियमित भरण्यासंदर्भात नेहमीच ओरड होत असते. त्यामुळे शिक्षकांच्या नियमित उपस्थिती बाबत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. आता त्यावर आणखी एक उपाय म्हणून बायोमेट्रीक व फेसरिडींग सुरू करण्यात येणार आहे.
वाढत्या तक्रारींची दखल
दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत नेहमीच तक्रारी होत आहेत. जिल्हा परिषदांच्या सभांमध्ये देखील याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित होत असतो. त्याला उत्तर देतांना अधिकारीही संभ्रमात असतात. ही समस्या कायम स्वरूपी मिटावी, तक्रारी कमी व्हाव्या, शिक्षक नियमित शाळांवर उपस्थित राहावेत यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे.
यासाठी प्रत्येक शाळेवर बायोमेट्रीक किंवा फेसरिडींग उपकरण बसविले जाणार आहे. त्याद्वारे हजेरी नोंदविण्यात येणार आहे. हे उपकरण जीपीएस सिस्टिमद्वारे थेट मुख्यालयाला किंवा तालुका गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला जोडले जाणार आहे. त्याद्वारे शिक्षकांची हजेरी तपासली जाणार आहे. या उपक्रमाला सुरुवात होण्यास पुढील शैक्षणिक वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.
कनेक्टिीव्हटीची समस्या
दुर्गम भागात साध्या मोबाईलची रेंज राहत नाही अशा ठिकाणी जीपीएस सिस्टिम कशी काम करणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण विभागाकडे काय उपाययोजना आहेत याबाबत मात्र अनभिज्ञता कायम आहे.
अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी आश्रमशाळांमध्ये करण्यात आला होता. परंतु अवघ्या महिनाभरात आश्रम शाळांमधील बायोमेट्रीक उपकरण बंद पडले होते. ते कसे बंद पडले हा त्यावेळी संशोधनाचा विषय ठरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात येणारे बायोमेट्रीक व फेसरिडींग मशीन देखील किती दिवस चालतील याबाबतची उत्सूकता देखील कायम आहेच.
दुर्गम भागातील अनेक शाळांना इमारती नाहीत, वीज पुरवठा नाही अशा ठिकाणी फेसरिडींग व बायोमेट्रीक यंत्र कसे काम करेल हा मोठा प्रश्न आहे. शिवाय मोबाईल टॉवर दोन ते तीन दिवस बंद असतात. त्यामुळे जीपीएस सिस्टिम कसे काम करेल ही शंकाच आहे.
शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, जीपीएस सिस्टिमसाठी कनेक्टिीव्हीटी गजर राहणार नाही. संबधीत शिक्षक संबधीत वेळेत त्या क्षेत्राच्या बाहेर गेला तर त्याची गैरहजेरी नोंदविली जाणार आहे. परंतु ही यंत्रणा कशी काम करेल हे शिक्षण विभागाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.