अखेर विद्यार्थ्यांसाठी बस सवलत पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:42 IST2020-12-18T10:41:45+5:302020-12-18T10:42:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.महामंडळाने विद्यार्थ्यांना बस सवलत पास देण्याचा निर्णय घेतला असून पास वाटप सुरू करण्यात आले ...

अखेर विद्यार्थ्यांसाठी बस सवलत पास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस.टी.महामंडळाने विद्यार्थ्यांना बस सवलत पास देण्याचा निर्णय घेतला असून पास वाटप सुरू करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. दरम्यान, ग्रामिण भागातील बसफेऱ्या देखील वाढवाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील नववी ते १२ वीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडल्या आहेत. परंतु ग्रामिण भागातून बसफेरऱ्या सुरू केल्या नसल्याने आणि बस सवलत पास वितरीत केल्या गेल्या नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम दिसून येत होता. त्यामुळे शिक्षक, पालक, शाळा यांनी एस.टी.महामंडळाकडे ग्रामिण भागातील बस फेऱ्या व विद्यार्थ्यांना पास उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. जोपर्यंत पास उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळांमधील विद्यार्थी संख्या देखील वाढणार नाही हे सूत्र लक्षात घेऊन महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांकडे देखील पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्याची दखल घेऊन महामंडळांने विद्यार्थ्यांना बस सवलत पास देण्याचा निर्णय घेतला आहे.
नंदुरबार आगारात त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी स्पेशल एक काऊंटर सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून या ठिकाणी पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. नववी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असली तरी बसफेऱ्या सुरू करतांना आवश्यक ते नियोजन करावे अशी मागणी देखील पालक व शिक्षकांमधून करण्यात येत आहे. दरम्यान, विद्यार्थींनींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस देखील सुरू करण्यात याव्या अशी मागणी करण्यात येत आहे.