गेल्या वर्षीचा पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST2021-07-26T04:27:51+5:302021-07-26T04:27:51+5:30
बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत ...

गेल्या वर्षीचा पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत असल्याने शेतकरीही मोठ्या आशेने पिकांचा विमा उतरवित असत. मात्र, गेल्या वेळेसचा म्हणजे सन २०२० मध्ये पिकांचे नुकसान होऊनही विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा कंपनीवरचा भरोसा कमी झालाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांची मदार ही पावसावर आहे. पाऊस पडला तर ठीक नाही तर उन्हाळाच, त्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरण्याला जास्त महत्त्व देत आहेत. परंतु गेल्या वेळेस अति पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, असे असतानाही कंपनीने विमा मंजूर केला नाही. खरीप हंगामातील पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु गतवर्षीच्या खरीप हंगामात भरलेला विमा मंजूर न झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा सुरक्षित करण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरलेला होता व अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. तरीही जिल्ह्यातील नेतेमंडळी चिडीचूप असल्याने त्याचाच परिणाम म्हणून की काय, या वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
मागील वर्षी पपई, केळी, कापूस, तूरसह इतर पिकांचा पीकविमा उतरविला होता. शेवटी प्रयत्न म्हणून विमा मिळेल, अशी आशा होती. पण आता विमा परतावा मिळण्याची आशा पार मावळली असल्याने यावर्षीचा पीकविमा भरण्याची द्विधा परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी जसा खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह होता तसा यावेळेस उत्साह दिसत नाही. गेल्या वर्षीचा २०२०चा पीकविमा मिळाला नसल्यामुळे आता २०२१च्या खरीप हंगामातील विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
- भय्या गवळे, आपले सरकार सेवा केंद्र, बामखेडा
खरीप हंगाम २०२० मध्ये तालुक्यातील वडाळी महसूल मंडळात बहुतेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील क्षेत्राचा पीकविमा भरला होता. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीला रक्कम भरली होती. मात्र शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
- बन्सी पटेल, शेतकरी, बामखेडा