मोबाइलच्या जमान्यातही लॅण्डलाइन, क्वाईनबाॅक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’ वाजतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST2021-09-04T04:37:22+5:302021-09-04T04:37:22+5:30
नंदुरबार : २० वर्षांपूर्वी घरोघरी खणखणणारा दूरध्वनी आणि अनेकांना आधारस्तंभ असलेले काॅईनबाॅक्स हद्दपार झाले आहेत. स्मार्टफोनच्या दुनियेत हे यंत्र ...

मोबाइलच्या जमान्यातही लॅण्डलाइन, क्वाईनबाॅक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’ वाजतेय
नंदुरबार : २० वर्षांपूर्वी घरोघरी खणखणणारा दूरध्वनी आणि अनेकांना आधारस्तंभ असलेले काॅईनबाॅक्स हद्दपार झाले आहेत. स्मार्टफोनच्या दुनियेत हे यंत्र हरवले असले तरी त्याच्या स्मृती मात्र कायम आहेत. याच स्मृतींचे अवशेष म्हणून शहरात आजही स्टेशनरोडवर दोन ठिकाणी काॅईनबाॅक्स नजरेस पडत असून दूरध्वनींची संख्याही कमी झाली आहे.
बदल हा सृष्टीचा नियम आहे. तंत्रज्ञान विकासात हा नियम महत्त्वाचा असतो. प्रत्येक गोष्टी अपग्रेड होत राहणं किंबहुना त्या करत राहिल्याने प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशभरात दूरध्वनी सेवा सार्वजनिकपणे सुरू झाली. कालांतराने त्यात बदल होत गेले. ९० च्या दशकात टेलिफोन हा घराघरात पोहोचला. सोबत एसटीडी सेवा घेऊन आला. यातून रोजगार मिळतो म्हणून दारोदारी एसटीडी सेवाही सुुरू झाली. अपग्रेड होत असलेल्या या दूरध्वनी सेवा २००० सालाच्या सुरुवातीला काॅईनबाॅक्स ही एक वेगळी संकल्पना सापडली. यातून दूरवर राहणाऱ्या आपल्या माणसांसोबत जवळच्या गोष्टी व्हायला लागल्या. परंतु हा काॅईनबाॅक्स अल्पजीवी ठरून १० वर्षात त्याचा ऱ्हास झाला. सध्या नंदुरबारात केवळ दोन ठिकाणी हे वस्तूवजा फोन दिसून येतात.
जिल्ह्यात केवळ ३ हजार लण्डलाईन
मोबाईल फोन गरजेचा झाल्याने लॅण्डलाईन फोनचे महत्त्व कमीच झाले आहे. यातून अनेकांच्या घरी असलेले लॅण्डलाईन कनेक्शन काढून टाकण्यात आले आहे. परिणामी जिल्ह्यात केवळ ३ हजार दूरध्वनी आहेत. यात शासकीय, खासगी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने यातच त्यांचा वापर अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण भागातून तर दूरध्वनी हद्दपार होण्याच्या स्थितीत आहेत.
जिल्ह्यात दोन ठिकाणी काॅईनबाॅक्स
कधी काळी १० हजारांच्या जवळपास गेलेले काॅईनबाॅक्स आता केवळ दोनच ठिकाणी दिसून येतात. दूरसंचार विभागाच्या रेकाॅर्डनुसार मात्र जिल्ह्यात एकही काॅईनबाॅक्स नाही. नंदुरबार शहर आणि तळोदा येथे काॅईनबाॅक्स असल्याची माहिती आहे. अल्पजीवी ठरलेले काॅईनबाॅक्सचे संच शहरी आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये भंगार म्हणून पडून असल्याचे चित्र आहे.
काॅईनबाॅक्स वापरणारे कोण?
एक रुपयात एक मिनिट बोलू देणारा काॅईनबाॅक्स हा गरीबांचा मोठा आधार होता. सासरी असलेल्या मुलींना, शिक्षणासाठी बाहेर गावी असलेली मुले, मजूरीसाठी घर सोडून आलेले आणि प्रियकर-प्रेयसी यांच्या काॅईनबाॅक्स एक हक्काचं व्यासपीठ होतं. शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या काॅईनबाॅक्सवर अनेक जण रुपया टाकत बोलत असल्याचे पूर्वी दिसून येत होते.
घरात एक सुविधा म्हणून दूरध्वनी असायला हवा, आमच्याकडे तो आजही सुरु आहे. मोबाइल नेटवर्कच्या समस्या उद्भवतात. यावर मात करण्यासाठी दूरध्वनीचे कनेक्शन सुरू ठेवले आहे. अनेकजण त्यावर संपर्क करतात.
-जितेंद्र जाधव, नंदुरबार,
साधारण २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून दूरध्वनी वापरत आलो आहे. लहान असल्यापासून संच पाहतो आहे. पाणी वारा पाऊस यात अविरत सेवा मिळाली आहे. आजही सेवा मिळत आहे. येत्या काळातही हीच सेवा सुरळीत राहील.
-विपुल पाटील, नंदुरबार.
आलेख घसरला..
दूरसंचार विभागाचे धुळे-नंदुरबार असेच कामकाज आजही चालते. या सर्कलमध्ये कधीकाळी ८५ हजार घरांमध्ये दूरध्वनी होते. कालांतराने त्यांची संख्या कमी होऊन ती आज ३ हजारांवर आली आहे.