स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नयामाळ रस्त्यापासून लांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:55 IST2020-08-30T12:54:23+5:302020-08-30T12:55:06+5:30
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील नयामाळ येथे दळणवळणासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही रुग्णाला उपचारासाठी ‘बाबूलन्स’ने ...

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नयामाळ रस्त्यापासून लांब
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील नयामाळ येथे दळणवळणासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही रुग्णाला उपचारासाठी ‘बाबूलन्स’ने (बांबूची झोळी करून) डोंगरावरून पायपीट करत आणावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सातपुड्यातील आदिवासींच्या नशीबी साधी रस्त्याची सुविधा उपलब्ध केली जात नसल्याने आदिवासींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तळोदा तालुक्यातील सातपुड्यात जवळपास ३० ते ४० पाडे वसलेले आहेत. या सर्व पाड्यांमध्ये साधारण एक हजाराहून अधिक आदिवासी कुटुंब राहत आहेत. परंतु या कुटुंबांना आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे देशाने यंदा स्वातंत्र्याची पंचात्तरही साजरी केली असताना दुसरीकडे दुर्गम भागातील आदिवासी जनतेला रस्त्यांसाठी झुजावे लागत आहे. कारण या पाड्यांमध्ये दळणवळणासाठी रस्ते नसल्याने कुटुंबातील कोणी व्यक्ती आजारी पडला तर त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा प्रश्न पडतो. कारण पायपीट करत त्यास दवाखान्यात न्यावे लागते. असेच चित्र तालुक्यातील नयामाळ या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांबाबतही दिसून आला.
नयामाळ पाड्यावरील एका कुटुंबातील निर्मलाबाई फोत्या वळवी ही ४५ वर्षाची महिला आजारी असल्यामुळे तिला उपचारासाठी तिच्या कुटुंबाने शनिवारी सकाळी अक्कलकुवा येथील दवाखान्यात झोळीतून डोंगरावरून पायपीट करत आणले होते. सध्या पावसाळी वातावरणामुळे मलेरिया, टायफाईड आदी आजारांची साथ सुरू आहे. या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामस्थांना रुग्णाला उपचारासाठी दवाखाना अथवा आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी न्यावेच लागते. परंतु त्यांना रस्त्याचा प्रश्न भेडसावतो. वास्तविक या पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांसाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावे, अशी तेथील आदिवासींची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. एवढेच नव्हे तर या परिसरातील ग्रामपंचायतींनीही रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी दोन-तीन वर्षापासून पाठविला आहे. मात्र त्यावर आजतागायात कार्यवाही झालेली नाही, असे सांगितले जात आहे. प्रभावी आरोग्य यंत्रणेअभावी पुरेसा उपचार मिळत नाही. कुठे इमारतींची दूरवस्था तर कुठे कर्मचाऱ्यांची वानवा असे चित्र आहे. या पाड्यांच्या महसुली गावांचा प्रश्नही शासनस्तरावर तसाच प्रलंबित पडला आहे. जवळपास ६० ते ६५ पाड्यांचा यात समावेश आहे. याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावाही सुरू आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरुन दुर्लक्ष असल्याने महसुली गावांचा प्रश्न रखडला आहे. महसुली दर्जाअभावी त्यांना पायाभूत सुविधांसाठी आजपावेतो झगडावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातपुड्यातील पाड्यांमधील रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, निशांत मगरे, दिवरसिंग वसावे, देविसिंग पाडवी यांनी केली आहे.
नयामाळ पाड्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थ नेहमी आजारी रुग्णाला उपचारासाठी आणताना ‘बांबूलन्स’ने डोंगरावरून १५ किलोमीटर पायपीट करीत तळोदा तालुक्यातील इच्छगव्हाण गावापर्यंत आणतात. तेथून खासगी वाहनाने अक्कलकुवा जवळ पडत असल्यामुळे तेथे नेतात. अशावेळी खासगी वाहन चालक अव्वाचा सव्वा पैसे मागतात. नाईलाजाने तेवढी रक्कमही द्यावी लागत असल्याचे नातेवाईक सांगतात. सध्या साथीचे आजार व कोरोनाची महामारी लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सजग व पुरेशी ठेवण्याची मागणी आदिवासींनी केली आहे.
सातपुड्यातील आदिवासी पाड्यांमध्ये रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांअभावी आजारी रुग्णाला नेहमीच ‘बांबूलन्स’ने झोलीतून पायपीट करीत न्यावे लागते. या भागात रस्ते करण्याबाबत सातत्याने मागणी करीत आहोत. मात्र कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आरोग्यासारख्या अत्यंत गरजेच्या सुविधेपासून वंचित राहावे लागते.
-फोज्या वळवी,
ग्रामस्थ, नयामाळ, ता.तळोदा.