The establishment of the ZP power continued | जि.प.सत्ता स्थापनेचा तिढा कायम
जि.प.सत्ता स्थापनेचा तिढा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेनेने अद्याप आपली भुमिका स्पष्टपणे उघड केलेली नाही. काँग्रेस व भाजपने सत्ता स्थापनेसाठी प्रबळ दावेदारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे सहा पंचायत समितींपैकी शहादा व तळोदा पंचायत समितींमध्ये अटीतटीचा सामना आहे. येथे कुणाची सत्ता बसते याकडे आता लक्ष लागून आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची १७ रोजी निवड होणार आहे.
जिल्हा परिषदेत कुणालाही बहुमत न मिळाल्याने सत्तेचा तिढा कायम आहे. १७ रोजी अध्यक्षनिवड होणार आहे. असे असले तरी अद्यापही चित्र स्पष्ट होत नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. दुसरीकडे पंचायत समितींवर देखील सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळालेल्या त्या त्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
संक्रातीनंतर उलगडा होणार
संक्रांतीच्या आधी काहीही पत्ते खोलायचे नाहीत असा चंग शिवसेनेने बांधलेला आहे. भाजप व काँग्रेसने संपर्क साधला आहे. सेनेने त्यांना आपला प्रस्ताव दिला आहे. परंतु वरिष्ठ नेते जो निर्णय देतील त्यानुसार सेनेने पुढे सरकरण्याचे ठरविले आहे. परंतु त्यासाठी स्थानिक नेत्यांचा निर्णय आणि पाठपुरावा हा महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेना संक्रांतीनंतर अर्थात १६ तारखेलाच आपले पत्ते ओपन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन्ही पक्षांचा दावा
जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेचा दावा भाजप व काँग्रेसने केला आहे. परंतु बहुमत कसे साध्य करणार याबाबतत कुणीही स्पष्टपणे बोलत नाही. त्यामुळे अद्यापही संभ्रमाची स्थिती कायम आहे.
यांची झाली गटनेतेपदी निवड
सर्वच अर्थात चारही पक्षांनी आपल्या गटनेतेपदाची निवड केली आहे. भाजप-राष्ट्रवादीने आपल्या गटनेतेपदी कुमुदिनी विजयकुमार गावीत यांची निवड केली आहे. काँग्रेसने सी.के.पाडवी यांची निवड केली आहे. शिवसेनेने अ‍ॅड.राम रघुवंशी यांची निवड केली आहे. त्यामुळे या गटनेत्यांचा व्हिप आता त्या त्या पक्षाच्या सदस्यांना लागू राहणार आहे.
पंचायत समितींसाठीही धडपड
पंचायत समितींवर सत्ता स्थापन करण्यासाठी देखील प्रमुख पक्षांची धडपड सुरू आहे. सहा पैकी चार पंचायत समितींवर कुणाची सत्ता बसणार हे स्पष्ट आहे. परंतु शहादा आणि तळोदा पंचायत समितींमध्ये अद्यापही सत्तेबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.
नवापूर व अक्कलकुवा पंचायत समितीत काँग्रेसला बहुमत आहे. धडगाव पंचायत समितीत शिवसेनेला तर नंदुरबार पंचायत समितीत भाजपला काठावरचे बहुमत आहे. शहादा पंचायत समितीत मात्र दोलायमान स्थिती आहे. २८ जागा असलेल्या या पंचायत समितीत भाजपला १४ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला १२ तर इतर पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. इतर दोन सदस्य कुणाकडे वळतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
तळोदा पंचायत समितीचा तिढा मात्र मोठा आहे. या ठिकाणी दहा सदस्य असून काँग्रेस व भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथील तिढा मोठा उत्सूकतेचा राहणार आहे.
पंचायत समितीसाठीचे सर्व सभापतीपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. सहा पैकी तीन ठिकाणी महिला प्रवर्गाचे आरक्षण राहणार असून १४ रोजी ते काढले जाणार आहे. उपसभापतीपदाबाबत पक्षाअंतर्गत मोठी चुरस राहणार आहे.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य निवडून आले आहेत. हे तिन्ही सदस्य नवापूर तालुक्यातील आहेत. राष्ट्रवादीने भाजप सोबत जाण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भाजपकडे आता संख्याबळ २६ झाले आहे. राष्ट्रवादीचे तिन्ही सदस्य हे भाजपच्या पाठबळावरच निवडून आले असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांचा कल भाजपकडेच राहणार हे स्पष्टच होते. अर्थात घडलेही तसेच.
४भाजपला आणखी तीन सदस्यांची गरज लागणार आहे. परंतु काँग्रेस व शिवसेनेतील सदस्य फुटण्याची शक्यता आजच्या स्थितीत कमीच आहे. त्यामुळे तिढा कायम राहणार आहे. दुसरीकडे शिवसेना आपल्या सातही सदस्यांसह कुणाकडे कल दर्शविते याकडे लक्ष लागून असून त्यावरच सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १७ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
दुपारी एक ते दीड या काळात अर्जांची छाननी होईल. दीड ते दोन या काळात माघारीची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी तीनला सर्व नवनिर्वाचित सदस्यांची अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी सभा बोलविण्यात आली आहे.
सुरुवातीला अध्यक्षपदाची निवड होईल व त्यानंतर उपाध्यक्षपदाची निवड होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.
सभेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात राहणार आहे.
४सर्वच पक्षांनी आपल्या सदस्यांवर नजर ठेवली आहे. कुणीही फूटू नये यासाठी लक्ष दिले जात आहे.

 

Web Title: The establishment of the ZP power continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.