कर्मचाऱ्यांनी पाळला ‘नो व्हेईकल डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:13 IST2020-12-16T13:13:08+5:302020-12-16T13:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यास मदत होण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासह इंधन बचत व्हावी व धावपळीच्या ...

कर्मचाऱ्यांनी पाळला ‘नो व्हेईकल डे’
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यास मदत होण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासह इंधन बचत व्हावी व धावपळीच्या युगात शरीराला किमान एक दिवस व्यायाम व्हावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंगळवारी शहादा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन न वापरण्याचा निर्णय घेऊन प्रायोगिक तत्वावर ‘नो व्हेईकल डे’ अनोख्या पद्धतीने साजरा केला. यापुढील प्रत्येक मंगळवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी या अनोख्या उपक्रमात स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.
धावपळीच्या युगात प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली असल्याने शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आज वेळ नाही. परिणामी विविध व्याधी जडत असतात. नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे असतानाही ते शक्य नसल्याने नागरिकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते. वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर केल्यामुळे इंधनाची विक्री सर्वाधिक होत आहे. त्याचप्रमाणे वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण प्रदूषित होते. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कुठलेही वाहन न वापरता दैनंदिन काम करण्याची संकल्पना शहादा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी प्रायोगिक तत्त्वावर राबविली. सर्व कर्मचारी आज आपल्या घरून कार्यालयात पायी चालत आले व त्यांनी दैनंदिन कामकाज केले.
राज्य शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत ‘माझी वसुंधरा अभियान’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा प्रमुख उद्देश आहे. यात आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेइकल डे’ अर्थात यादिवशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी कुठलेही वाहन न वापरता पायी अथवा सायकलीद्वारे आपले दैनंदिन कामकाज करावे, हा प्रमुख उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत शहादा नगरपालिका सहभागी झाली असून मंगळवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर ‘नो व्हेइकल डे’ साजरा करून मोहिमेचा शुभारंभ केला आहे.
नागरिकांनीही सहभागी व्हावे
‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाने आठवड्यातून एक दिवस वाहन वापरायचे नाही. एक दिवस पायी चालणे अथवा सायकल वापरणे आवश्यक आहे. मंगळवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने यादिवशी ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी आपली सगळी कामे फक्त पायी अथवा सायकल वापरूनच करायची, कोणीही मोटारसायकल किंवा चारचाकी वाहन वापरु नये. आठवडयातून फक्त मंगळवारी ‘नो व्हेइकल डे’ साजरा करायचा आहे. या अभियानाची सुरुवात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयापासून केली आहे. यापुढे या उपक्रमात सर्व शहादेकर याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील व सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.