राज्यातही २३ जानेवारीपासून शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:56+5:302021-01-18T04:28:56+5:30

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार २३ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत ४ दिवस ठिय्या महामुक्काम आंदोलन करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ...

Elgar of farmers in the state from January 23 | राज्यातही २३ जानेवारीपासून शेतकऱ्यांचा एल्गार

राज्यातही २३ जानेवारीपासून शेतकऱ्यांचा एल्गार

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार २३ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत ४ दिवस ठिय्या महामुक्काम आंदोलन करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती सत्यशोधकचे अध्यक्ष रामसिंग गावित, सेक्रेटरी करन्सिंग कोकणी व संघटक किशोर ढमाले यांनी दिली.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने (महाराष्ट्र) मुंबईत १२ जानेवारीला झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील आंदोलनाची रणनीती जाहीर केली. २३ ते २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांचा भाग असणाऱ्या शेकडो संघटना एकजुटीने करणार आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. तसेच १८ जानेवारी रोजी ‘किसान महिला दिवस’ देशभर साजरा करण्याची हाक दिली आहे. महाराष्ट्रात या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध समविचारी किसान, कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरत आहेत. सत्यशोधकचे कार्यकर्ते नुकतेच दिल्ली शाहाजांपूर व टिकरी बॉर्डर वरील आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन परतले असूनही मुंबई आंदोलनात ताकदीने उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आर. टी. गावित, जिल्हा सचिव रणजित गावित यांनी सांगितले.

विविध संघटना २३ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिकांसह मुंबईच्या दिशेने निघतील. २४ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सर्वजण एकत्र येतील व २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता राजभवनाच्या दिशेने कूच करतील. २६ जानेवारी रोजी शेतकरी कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल, असे कोकणी, गावित व ढमाले यांनी सांगितले.

सत्यशोधक शेतकरी सभेचे १५०० कार्यकर्ते २३ जानेवारी रोजी विसरवाडी येथे क्रांतिवीर तंट्या भिल व सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यात ५०० महिलांचा सहभाग असेल, असे नंदुरबार तालुका अध्यक्षा लिलाबाई वळवी, नवापूर तालुका अध्यक्षा गेवाबाई गावित यांनी सांगितले.

Web Title: Elgar of farmers in the state from January 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.