शहादा तालुक्यातील 27 ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:11 IST2020-12-18T11:11:27+5:302020-12-18T11:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ...

शहादा तालुक्यातील 27 ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली असून, २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे.
तालुक्यात १५० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी नागझिरी, कोटबांधणी, राणीपूर, असलोद, न्यू असलोद या पाच ग्रामपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. परंतु कोरोनामुळे तो रद्द करण्यात आल्याने आता पुन्हा या ठिकाणी नव्याने निवडणुका होणार आहेत. तसेच जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्याठिकाणीही निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम
२३ ते ३० डिसेंबर सार्वजनिक सुट्टी वगळून नामनिर्देशनपत्रे मागवणे व सादर करणे, ३१ डिसेंबर छाननी, ४ जानेवारी नामनिर्देशन पत्र मागे घेणे व त्याच दिवशी दुपारी निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध, १५ जानेवारी मतदान, १८ जानेवारी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.
निवडणुका हाेणाऱ्या ग्रामपंचायती
कुकावल, कोठली त.सा., कुऱ्हावद त.सा., कौठळ त.सा., दोंदवाडे, तोरखेडा, नांदरखेडा, वर्धे त.श., टेंभे त.श., शेल्टी, बामखेडा त.सा., बामखेडा त.त., फेस, पुसनद, सोनवद त.श., कानडी त.श., मनरद, मोहिदे त.श., सारंगखेडा, डामरखेडा, हिंगणी, नागझिरी, कोटबांधनी, राणीपूर, असलोद, न्यू असलोद आदी २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
उमेदवार शोध मोहिम
ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित होत नाही तोच गावागावात तगडा उमेदवार देण्याची शोधमोहीम आखली जात आहे. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच बहुमत सिद्ध करून सरपंच निवड होणार असल्याने आपल्या मर्जीतला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पुढे करण्यासाठी पॅनल प्रमुख सरसावले आहेत.