विरोधामुळे अध्यक्षांनी सभागृहच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 11:58 IST2020-05-28T11:56:53+5:302020-05-28T11:58:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सत्ताधारी काँग्रेस त्यांच्याच सदस्यांच्या गटात कामे मंजुर करतात यासह इतर विषयांवरून भाजपने काँग्रेसला चांगलेच ...

Due to opposition, the Speaker left the House | विरोधामुळे अध्यक्षांनी सभागृहच सोडले

विरोधामुळे अध्यक्षांनी सभागृहच सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सत्ताधारी काँग्रेस त्यांच्याच सदस्यांच्या गटात कामे मंजुर करतात यासह इतर विषयांवरून भाजपने काँग्रेसला चांगलेच अडचणीत आणले. आक्रमक झालेल्या भाजपमुळे अखेर अध्यक्षा सीमा गावीत यांना अर्ध्यातूनच सभा सोडून जावे लागले. त्यांच्या मागोमाग काँग्रेस सदस्यही निघून गेले. परंतु भाजप सदस्य सभागृहात बसून होते. प्रतिसभा घ्यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली. परंतु ती नामंजूर करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसचे १६ तर भाजपचे २४ सदस्य उपस्थित होते. शिवसेनेचे केवळ उपाध्यक्ष उपस्थित होते.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा सीमा गावीत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. सभेत आज सत्ताधारी काँग्रेसचे अवघे १६ सदस्य उपस्थित होते. तर भाजपचे २४ सदस्य उपस्थित होते. त्यामुळे भाजपने ही संधी साधत काँग्रेसला चांगलेच कोंडीत पकडले. गेल्या काही दिवसात विविध कामे मंजुरीवरून ही धूसफूस सुरूच होती. नंदुरबार व नवापूर तालुक्याला विकास कामांपासून ढावलले जात असल्याची सूप्त नाराजी होतीच ती आजच्या सभेतून बाहेर निघाली.
भाजप आक्रमक...
सुरुवातीचा विषय सदस्यांच्या रजेचा अर्जाच होता. शिवसेनेचे सहा आणि काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या रजेचा अर्ज मंजुर करण्यात आला. त्यानंतर इतिवृत्त आणि मागील सभेत केलेल्या ठरावांचा आढावा सादर करण्याचा विषय येताच तो नामंजूर करावा यासाठी मतदान घ्यावे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. यावर अध्यक्षांनी मतदान घेण्याची गरज नाही. तुमचा विरोध नोंदवून घेतो असे सांगून पुढचा विषय घेण्याचे सुचविले. त्यावर विरोधकांमधून भरत गावीत, अर्चना गावीत, धनराज पाटील हे आक्रमक झाले. कोरोनाचे आणि सदस्यांच्या रजा मंजुरीचे विषय वगळता इतर सर्व विषयांवर मतदान घेवूनच ते मंजुर करावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी भाजपचे सदस्य आक्रमक झाले. डायसपुढील मोकळ्या जागेत देखील सदस्य येवू लागले. दुसरीकडे काँग्रेसकडून आक्रमक कुणीच नव्हते. केवळ सभापती अभिजीत पाटील आणि सदस्य सुहास नाईक यांनी किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपच्या आक्रमक सदस्यांपुढे उपयोग झाला नाही.
अध्यक्षांचा काढता पाय...
सभेतील वाढता विरोध पहाता सभेचे कामकाज चालू शकणार नाही हे पहाता अध्यक्षा सीमा वळवी यांनी सभेतून काढता पाय घेतला. त्या बाहेर निघताच काँग्रेसचे सभापती आणि सदस्य यांनीही सभागृह सोडले. उपाध्यक्ष तथा शिवसनेचे सदस्य अ‍ॅड.राम रघुवंशी यांनीही थोड्या वेळात आपल्या चेंबरमध्ये जाणे पसंत केले. अधिकारीही नंतर सभागृहातून बाहेर निघाले.
दुसरीकडे भाजपचे सदस्य सभागृहात ठाण मांडून होते. सभा सुरू करा अशी मागणी त्यांनी लावून धरली.
प्रती सभा घेण्याची मागणी
अध्यक्षा व पदाधिकारी जर सभागृहात येत नसतील तर भाजपच्या उपस्थितीत सदस्यांमधून ज्येष्ठ सदस्याची अध्यक्षपदी निवड करून प्रती सभा घेवून चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे यांची त्यांनी भेट घेतली. परंतु तसे होऊ शकत नाही अशी समजूत या दोन्ही अधिकाऱ्यांनी घातली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता भाजपचे सदस्य जिल्हा परिषदेबाहेर निघाले.
विषय नामंजुरचे निवेदन
सभागृहात भाजप सदस्यांची संख्या अधीक असल्याने विषयांना विरोध पहाता ते विषय नामंजूर करावे अशी मागणी करण्यात आली. त्यात मागील सभेचे इतिवृत्त नामंजूर करावे. २०२०-२१ चे अंदाजपत्रक नामंजूर करावे, मागील सभेतील ठरावांवरील पुर्ततेचा आढावा यासह इतर विषयांचा समावेश आहे. केवळ कोवीड योद्धयांना विमा संरक्षण कवच आणि कर्मचारी विमा व सदस्यांचे रजा मंजुरीचे अर्ज हे विषय मंजूर करून इतर सर्व अर्थात २३ विषय नामंजूर करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सत्ताधारी व विशेषत: अध्यक्षांची सभा चालविण्याची पद्धत लोकशाहीला धरून नाही. विरोधकांच्या मतांचाही सन्मान राखला जावा अशी अपेक्षाही या निवेदनात नमुद करण्यात आली आहे.
झूप अ‍ॅपनेही सोय
ज्या सदस्यांना बैठकीत येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी त्या त्या पंचायत समिती स्तरावर झूप अ‍ॅपद्वारे बैठकीत सहभागी होता येईल अशी सोय करण्यात आली होती. परंतु त्याचा उपयोग एकाही सदस्याने घेतला नसल्याचे चित्र होते.

जिल्हा परिषदेत कामे वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून प्रचंड धूसफूस सुरू आहे. नंदुरबार व नवापूर तालुक्यातील भाजप, शिवसेनेच्या सदस्यांना ढावलले जात आहे. यामुळे सदस्यांमध्ये नाराजी होती. त्याच पार्श्वभुमीवर आजचा आक्रमक पवित्रा घेतला गेल्याचे एकुणच चित्र होते. वास्तविक सत्तेत तिन्ही पक्ष वाटेकरी असतांनाही दुजाभाव केला जात आहे. जिल्हा परिषद चालविण्याची ही कुठली पद्धत आहे असा प्रश्न भाजप सदस्यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषदेत काँग्रेस मनमानी कारभार करीत आहे. ठराविक तालुक्यांना व सदस्यांना झुकते माप दिले जात आहे. सत्तेच्या बळावर काम पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आज सत्ताधारी पदाधिकारी व सदस्यांनी केलेली वर्तवणूक लोकशाहीला धरून नाही. त्यामुळेच आम्ही प्रती सभागृह चालविण्याची मागणी केली होती. तीन विषय वगळता इतर सर्व विषयांना आमचा विरोध राहणार आहे.
-भरत गावीत, ज्येष्ठ सदस्य, भाजप.

Web Title: Due to opposition, the Speaker left the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.