जयनगरसह परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:41+5:302021-08-13T04:34:41+5:30
दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति ...

जयनगरसह परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली
दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात नदी-नाल्यांना पाणी येत असते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसावर पिके तग धरून ठेवत होती. मात्र, आता तीन आठवडे होऊन चालले तरी जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीपासून ते बी-बियाणे खते, कोळपणी, औषध फवारणीसाठी हजारो रूपये शेतीत टाकले आहेत. परंतु पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना शेतातील पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याशिवाय पर्याय नाही. असे झाले तर शेतकरी राजा खूपच आर्थिक विवंचनेत सापडणार आहे.
एकतर सुरूवातीपासूनच यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पिकांची उगवण तर कमी झाली. मात्र, कमी-अधिक प्रमाणात उगवण झाली आहे. जुलै महिना अर्धा झाल्यावर बऱ्यापैकी पाऊस झाला तेव्हा शेतकऱ्यांनी रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी केली होती. त्यामुळे पिके बऱ्यापैकी दिसत होती. मात्र आता बऱ्याच दिवसापासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत.
पावसाने अशीच दडी मारली तर शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे विहिरी तसेच कूपनलिकांना पाणी आहे, ते शेतकरी पिके वाचविण्यावर भर देत असले तरी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाणी पातळी खालावलेली दिसून येत आहे. एकंदरीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या दिवसात पाऊस झाला नाही तर काय होईल? या विवंचनेत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण शेती ही भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस कमी झाला तर सुरू असलेल्या विहिरी तसेच कूपनलिका ही बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत जमिनीतील पाणीसाठा वाढण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक वाचण्यासाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.
जून महिन्यात कापूस लागवड केली असून, तेव्हाही बरेच दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे निम्म्या क्षेत्रावर नवीन कापूस लागवड करावी लागली होती. आताही तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत. लवकरात लवकर पाऊस आला नाही तर कापूस पिकास मोड येण्याची शक्यता आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायला हवी.
- जगदीश हरी पाटील, शेतकरी, जयनगर.