डिझेलअभावी गाळ काढणी रखडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:28 IST2019-04-02T12:27:47+5:302019-04-02T12:28:08+5:30

गाळमुक्त धरण उपक्रम : कामाला गती देण्याची ग्रामस्थांची मागणी

Due to the failure of diesel to keep mud holes | डिझेलअभावी गाळ काढणी रखडतेय

डिझेलअभावी गाळ काढणी रखडतेय

शनिमांडळ : गाळमुक्त धरण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध धरणांतील गाळ काढणीची कामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ शासनाच्या खर्चातून हे काम करण्यात येणार असल्याने पोकलॅण्ड, डिझेल आदींची जिल्हा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती़ परंतु आता डिझेल उपलब्ध होत नसल्याने गाळ काढण्याच्या कामाची गती मंदावली असल्याची माहिती आहे़
गाळमुक्त धरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील साधारणत: २५ ते ३० तलावांमधून गाळ काढणीच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती़ त्यानुसार कामेही सुरु झालेली आहेत़ परंतु आता डिझेलअभावी कामे संथ गतीने होत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत कामाची गती वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
ट्रॉलीमागे शंभर रुपये
दरम्यान, पोकलॅण्डतर्फे गाळ काढण्यात येत असल्याने यासाठी डिझेलची आवश्यकता भासत असते़ परंतु जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकींच्या धामधुमीमध्ये याकडे लक्ष दिले जात नसल्याने साहजिकच बऱ्याच वेळा गाळ काढणीची कामे मंदावत असतात़ दरम्यान, तलावातील गाळ शेतीसाठी उत्तम असल्याने शेतकऱ्यांकडून आपआपल्या शेतात गाळ टाकण्यास पसंती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे गाळाच्या एका ट्रॉलीमागे शंभर रुपये शेतकरी मोजत असून यातूनच डिझेलचा खर्च भागवण्यात येत असल्याची माहिती आहे़ गाळ काढण्याचा उपक्रम शासनाच्या खर्चातून हाती घेण्यात आला असला तरी आता शेतकऱ्यांच्या पैशातूनच डिझेलचा खर्च काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़
उर्वरीत ठिकाणीही गाळ काढावा
जिल्ह्यातील उर्वरीत गाव तलावांचाही लवकरात लवकर गाळ काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ६८ पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे़ अक्कलकुवा तालुक्यात ५, धडगाव ३, नंदुरबार २५, नवापूर १२, शहादा १८ तर तळोद तालुक्यातील ५ पाझर तलावातून गाळ काढणीची कामे पूर्ण करण्यात आली आहे़ या ६८ तलावांमधून साधारणत: १ लाख ८९ हजार ९ घमी इतका गाळ काढण्यात आलेला आहे़ यासाठी २० लाख ७९ हजार रुपयांचा खर्च लागला असल्याची माहिती सांगण्यात आली़
दरम्यान, खोक्राळे, निंभेलख वडबारे, वावद, श्रीरामपूर, लोणखेडा, जुनमोहिदे, कंढरे, उमर्दे बु, भालेर, तिसी, शिंदगव्हाण, वडवद, अक्राळे, आसाणे, नांदखर्डे, चाकळे, घोटाणे, भिलाईपाडा, वाघाळे, बलवंड, रजाळे, खर्दे तलवाडे आदी पाझर तलावांमधून गाळ काढण्याची कामे करण्यात येत असून त्यांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे़ गाळ काढणीच्या कामांसाठी स्वयंसेवी संस्थांकडून देण्यात येणार आहे़
१५ ते २० फुटांपर्यंत गाळ
अनेक ठिकाणच्या ब्रिटीश कालीन गाव तलावांमध्ये सुमारे १५ ते २० फूट जाडी असलेला गाळाचे संचयन झाले आहे़ त्यामुळे पावसाळ्यात गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरत नसून पावसाचे पाणी वाहून जात आहे़ पहिल्यापासून नंदुरबार तालुक्यातील पुर्वेकडील भागात पाण्याची वानवा आहे़ भौगोलिक कारणांमुळे या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत निम्यापेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने या ठिकाणी पाण्याचे नेहमीच दुर्भिष्य जाणवत असते़ त्यामुळे ब्रिटीश सरकारणे विविध ठिकाणी तलाव बांधून त्यावेळी पाण्याचे नियोजन केले होते़ परंतु बरीच वर्षे होऊनदेखील अद्यापर्यंत या तलावातून गाळ काढण्यात आलेला नव्हता़ दरम्यान, शनिमांडळ येथील तलाव तसेच आंबेबारा येथील तलावाच्या माध्यमातून शनिमांडळसह, तिलाली, तलवाडे, रजाळे, बलवंड या गावांची तहान भागवली जात असते़ आता सध्या हा गावतलाव पूर्णपणे कोरडा झाला असून या तलावाचा गाळ काढणेही प्रशासनाला सोयीस्कर ठरत आहे़ यंदा जिल्ह्यात केवळ ६७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असल्याने साहजिकच तलावदेखील कोरडा पडलेला आहे़ त्यामुळे तलावाचा गाळ काढण्यात यावा यासाठी गावातील ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता़ दरम्यान, उपक्रमाबाबत रोजगार हमी योजनेच्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ़ अर्चना पठारे यांनी पाठपुरावा करुन सुरुवात केली होती़ त्यानंतर नवीन अधिकारी बदलून आल्याने उपक्रमाची कामेदेखील रखडली आहेत़

Web Title: Due to the failure of diesel to keep mud holes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.