संततधारेमुळे जिल्हाभरात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:28 PM2020-08-16T12:28:42+5:302020-08-16T12:28:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाभरात गेल्या २४ तासात पावसाचा जोर वाढल्याने तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. इतर ...

Due to the continuous flow of water in the entire district | संततधारेमुळे जिल्हाभरात पाणीच पाणी

संततधारेमुळे जिल्हाभरात पाणीच पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाभरात गेल्या २४ तासात पावसाचा जोर वाढल्याने तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. इतर तीन तालुक्यात देखील ५० मि.मी.पेक्षा अधीक पाऊस नोंदला गेला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत असलेली पावसाची ३५ टक्के तूट आता २० टक्केच्या आत आली आहे. दरम्यान, नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक आणि आंबेबारा प्रकल्प पुर्ण भरले आहेत. शिवाय जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढून ४५ टक्केपर्यंत गेला आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरीचा ७७.३३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी देखील ६४ टक्केवर गेल्याने जिल्हावासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यंदाचा पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यातील तीन तालुक्यात अर्थात तळोदा, अक्कलकुवा, नवापूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक १३८ मि.मी.पाऊस झाला. नवापूर तालुक्यात ८० मि.मी., तळोदा तालुक्यात ६८ मि.मी.पाऊस झाला. तर शहादा तालुक्यात ६१ मि.मी, नंदुरबार तालुक्यात ५९ तर धडगाव तालुक्यात ५८ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात सरासरीचा ७७.३३ मि.मी.पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वाधीक पाऊस नोंदला गेला आहे.
विरचकमधून विसर्ग...
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक प्रकल्पात ७५ टक्केपेक्षा अधीक पाऊस झाल्याने या प्रकल्पातून ५२५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. या प्रकल्पात अद्यापही पाण्याची आवक सुरूच आहे. या प्रकल्पाच्या आधी असलेले खोलघर, धनीबारा व आंबेबारा हे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे त्यातील विसर्ग सुरू आहे. त्यामुळे विरचक प्रकल्प यंदाही पुर्ण क्षमतेने भरणार आहे. परिणामी शहरवासीयांची पाण्याची समस्या यंदाही सुटणार आहे.
तापीची पातळी वाढली...
तापीच्या पाणी पातळीत पुढील ७२ तासापर्यंत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे २४ दरवाजे उघडले असून ७५,१२५ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचा पाणी विसर्ग अजून वाढणार आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ८ वाजता प्रकाशा बॅरेजचे चार दरवाजे २ मीटर उंचीने उघडण्यात आले असून २५ हजार ६१ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे ४ दरवाजे २ मीटर उंचीने उघडण्यात आले असून २८ हजार १९ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ७२ तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सातपुड्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे सुसरी, वाकी व गोमाई नदीला पूर आला आहे. या नद्यांचे पाणी गोमाई नदीद्वारे प्रकाशा येथे तापीला मिळते. तापीला आधीच पूर आलेला आहे. त्यात गोमाईचे पाणी तापीत जात नसल्यामुळे संगमावर पाण्याचा अथांग सागर झाला आहे. गोमाईमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. आणखी दोन दिवस ही परिस्थिती राहिली तर गेल्या वर्षासारखी स्थिती राहणार आहे. त्यामुळे प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले असून जास्तीत जास्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाची तूट भरून निघणार असून सरासरीच्या तुलनेइतका पाऊस या काळात नोंदला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Due to the continuous flow of water in the entire district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.