मद्यपान करुन वाहन चालवणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:47 IST2020-01-03T11:47:20+5:302020-01-03T11:47:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करुन वाहन चालवणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे़ वाहतूक शाखेने ...

मद्यपान करुन वाहन चालवणे पडले महागात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करुन वाहन चालवणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे़ वाहतूक शाखेने ब्रेथ अॅनलायझरद्वारे चाचणी केल्यानंतर चौघांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ विशेष म्हणजे चौघांची नववर्षाची सुरुवात न्यायालयात झाली होती़
नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर भरधाव वेगात वाहने चालवून गंभीर व प्राणघातक अपघातांना सामोरे जाण्याच्या घटना जिल्ह्यात यापूर्वीही घडल्या आहेत़ या घटनांना आळा घालण्यासाठी यंदा वाहतूक शाखेने कंबर कसली होती़ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांच्या मार्गदर्शनात ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील पाच ठिकाणी पॉर्इंट उभारुन वाहन तपासणी सुरु होती़ यात शहरातील जगतापवाडी चौक, बसस्थानक परिसर, धुळे चौफुली आणि रेल्वेस्टेशन रोड परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांची ब्रेथ अॅनलायझिंग टेस्ट करण्यात आल्यानंतर चौघे मद्यपान करुन ुदुचाकी व चारचाकी वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले होते़ चौघांवर तातडीने कारवाई करुन त्यांना १ जानेवारी रोजी न्यायालयात बोलावण्यात आले होते़ याठिकाणी त्यांनी दंडाची रक्कम भरल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली़ शहरात प्रथम ब्रेथ अॅनलायझरचा वापर करुन नवीन वर्षाच्या प्रारंभापूर्वीच चौघांवर कारवाईचा बडगा उगारल्याने बेशिस्तांची एकच धावपळ उडाली होती़ रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कारवाईचा धसका घेत अनेकांनी चोरटे मार्ग पकडून घर गाठले होते़
दरम्यान कर्मचाऱ्यांकडून ३१ डिसेंबरला सकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल ३४२ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आली़ यात त्यांचे वाहन परवाने, दुचाकीची कागदपत्रे, पीयूसी नसल्याचे व बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती़
शहरात यापुढेही बेशिस्त व मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांनी दिली आहे़