मंदाणे परिसरात दुबार पेरणीची पिकेही धोक्यात, दुष्काळाचे सावट; शेतकरी चिंतेत, नदीनाल्यांसह विहिरी कोरड्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:38+5:302021-08-14T04:35:38+5:30
सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील पूर्वेकडील मंदाणे परिसरात जून, जुलै महिना संपला. ऑगस्ट सुरू होऊन दोन आठवडे ...

मंदाणे परिसरात दुबार पेरणीची पिकेही धोक्यात, दुष्काळाचे सावट; शेतकरी चिंतेत, नदीनाल्यांसह विहिरी कोरड्याच
सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील पूर्वेकडील मंदाणे परिसरात जून, जुलै महिना संपला. ऑगस्ट सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संपूर्ण शहादा तालुक्यासह मंदाणे परिसरात अपेक्षित पाऊस नसताना शेतकऱ्यांनी आशेने पेरण्या केल्या होत्या. मात्र, नंतर वरुण राजाने दडी मारल्याने काही दिवसांपासून तर मे महिन्यासारखे ऊन पडत आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पावसाच्या हुलकावणीने खरीप पिके धोक्यात
शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने शेतात उगवलेली बाजरी, मूग, मकासह खरीप पिके वाचवण्यासाठी बळीराजा मेघराजाला विनवण्या करत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा वारंवार फटका सहन करणारा शेतकरी आता पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तरीही पावसाच्या आशेने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
शहादा तालुक्यासह मंदाणे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार अशी वेळ या परिसरात तर निर्माण होणार नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबर मोडले असून, दुसरीकडे महागाई आणि दुष्काळी परिस्थिती अशी स्थिती राहिल्यास जगणे कठीण होईल. एकीकडे कोरोनामुळे कामधंदा नाही. मजुरांना रोजगार नाही. मजूर कुठून पोटपाणी भरेल. त्यात महागाईने त्रस्त झालेला आहे. खतांच्या किमती व फवारणीसाठी लागणारे औषध, लागवडीसाठी लागणारे बियाणे आदींचे भाव शिगेला पोहोचले आहेत. यात बळीराजाला सावकारी कर्ज काढावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे सावकारी कर्जदेखील शेतकऱ्यास मिळणे कठीण झाले आहे.
बळीराजावर पुन्हा संकट
सुरुवातीला जून महिन्यात पाऊस पडलाच नाही. जुलै महिन्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके उगवलीच नाहीत. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. दुबार पेरणी करूनही आता परत काही दिवसानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यासह परिसरातील बागायती शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे. मात्र, खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता अधिक दिसत आहे.
खतांची केली आहे घरात साठवणूक
सद्यपरिस्थितीत खते महाग होत असून, शेतकऱ्यांना ऐनवेळी पाहिजे तेव्हा खते मिळत नाहीत. दरवर्षीप्रमाणे यंदाही युरिया खताचा तुटवडा सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांनी खतांच्या गोण्या घरात आणून ठेवल्या आहेत. खते शेतात टाकण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याला आता पुन्हा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे कोरोना महामारीमुळे उपजीविका भागवणे कठीण झाले आहे. दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली तर जगणे कठीण होईल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
गोमाई नदीचे पात्र कोरडेच
पावसाने अचानक दडी मारल्याने मध्यप्रदेशातून महाराष्ट्राकडे येणारी गोमाई नदी पावसाअभावी कोरडीच आहे. ही नदी मध्यप्रदेशातील पानसेमलकडून जावदे, ओझर्टा, भोरटेक, दामळदा, गोगापूर, भागापूर, लोणखेडा, शहादा आदी गावांशेजारी वाहून प्रकाशा येथे तापी नदीला मिळते. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले तरच याठिकाणच्या कूपनलिका व विहिरींना पाणी टिकून राहते अन्यथा भीषण पाणीटंचाई निर्माण होते. मागील कटू अनुभवावरून यावर्षी दमदार पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी घटेल, या भीतीने ऊस, केळी, पपई, मिरची, कापूस उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सर्वत्र नदी-नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या ठणठणीत असल्याचे चित्र आहे. येत्या दोन-चार दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर भीषण दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे, हे नाकारता येणार नाही.