सापांना मारू नका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:22+5:302021-08-13T04:34:22+5:30
ब्राह्मणपुरी : दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो. या दिवशी सापांची पूजा ...

सापांना मारू नका...
ब्राह्मणपुरी : दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो. या दिवशी सापांची पूजा केली जाते. मात्र, इतर दिवशी साप दिसल्यास सापांना मारून टाकले जाते. त्यामुळे सापांच्या अनेक जाती नष्ट होत आहेत. साप हा शेतकऱ्यांसाठी वरदान असतो. त्यामुळे सापांचे जतन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. वनविभागाने पुढाकार घेऊन जनजागृती करायला हवी, अशी जीवप्रेमींकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागपंचमीला नागाची पूजा करायची, त्याला दूध पाजण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु या पूजेसाठी जे नाग पकडले जातात त्यांचे किती हाल केले जातात; याची कल्पना आपल्याला नसते. भीती, घृणा, मृत्यू व पूजा या सर्वांची सांगड म्हणजेच साप. याच भीतीची जागा नागपूजेने घेतली. सापाची मूर्ती करून त्याची पूजा प्रचलित झाली. परंतु तोच पूजेचा साप आपला शत्रू होतो. तो दिसतो तेव्हा आपोआप आपण काठ्या, दगड घेऊन मारायला जातो. परिणामी, नागपंचमी साजरी करा, पण अंधश्रद्धा नको, असे आवाहन निसर्गमित्रांनी केले आहे.
सापांबद्दल समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा व गैरसमज आहेत. त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सापांबद्दल अफवेतून व अज्ञानामुळे आलेल्या अंधश्रद्धांमुळे दरवर्षी सापांना मारून टाकण्यात येत असते म्हणून जीवरक्षक संस्था नंदुरबार यांच्या वतीने साप मारू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जीवरक्षक संस्थेच्या सर्पमित्रांमार्फत दरवर्षी सर्पविज्ञान प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. मात्र, या कोरोनाच्या संचारबंदीतदेखील या वर्षी सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाइन गुगल मीटवर प्रबोधन करण्यात येणार आहे. आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे वन्यजीव प्राणी / सर्प आढळल्यास त्यास कोणीही मारू नये व संस्थेच्या सर्परक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
परिसरात आढळणारे विषारी सर्प
परिसरात जास्त प्रमाणात तीन प्रजातींचे विषारी सर्प आढळतात त्यात घोणस, मण्यार, नाग (कोब्रा) या प्रजातीचे सर्प आढळत असून, मानवी वस्तीकडे आढळल्यास सर्पमित्राच्या मदतीने सापांना जंगलात सोडण्यात येत असते.
सापाला कोणीही मारू नये, तो शेतकऱ्यांचा मित्र असून, शेतातले उंदीर सापांचे मुख्य अन्न घटक आहे. साप कोणावर डूख ठेवत नसून, नागरिकांनी गैरसमज करू नये. साप दूध पीत नाही, तो मांसाहारी असून दूध सापाला घातक असून, त्यातून विषबाधा होऊन साप मरू शकतो. परिसरात साप दिसल्यास त्याला न मारता जवळील सर्पमित्राशी संपर्क साधावा.
- किशोर नरोत्तम पाटील, सर्पमित्र, लोणखेडा, ता. शहादा