तापमान घसरल्याने जिल्हा गारठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:50 IST2020-11-13T12:50:46+5:302020-11-13T12:50:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा गारठला असून गेल्या दोन दिवसात किमान तापमान चार ते पाच अंशाने घसरले ...

तापमान घसरल्याने जिल्हा गारठला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा गारठला असून गेल्या दोन दिवसात किमान तापमान चार ते पाच अंशाने घसरले आहे. त्यामुळे पहाटे थंडीचा जोर वाढला आहे. सातपुड्यातील पहाडपट्टी देखील गारठली आहे. येते काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरू लागले आहे. बोचरी थंडीनंतर आता गारठा वाढू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसात त्याचा अनुभव जिल्हावासी घेत आहेत. गेल्या दोन दिवसात तर किमान तापमानाचा पारा हा चार ते पाच अंशाने घसरला आहे.
गेल्या महिन्यात अर्थात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत होता. कडक ऊन आणि असह्य उकाड्याने नागरिकांना हैराण केले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र तापमानात बदल होत गेला. नोव्हेंबर महिना तर थंडी घेऊनच आला. पहिल्या आठवड्यात बोचरी थंडी होती. आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहेत.
रात्रीचे किमान तापमान आता १५ ते १८ अंशावर होते ते आता १४ अंशांपर्यंत घसरले आहे. येत्या काही काळात तापमान आणखी घसरणार असून थंडीचा कडाका वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
सातपुड्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे. संपूर्ण सातपुडा गारठला असून दुर्गम भागातील जनता गारठली आहे. सातपुड्यात किमान तापमान हे सात ते १० अंशापर्यंत दरवर्षी राहत असते. यंदा देखील तापमान घसरण्याची शक्यता आहे. तोरणमाळ, डाब येथील तापमान डिसेंबर, जानेवारी महिन्यात कमालीचे घसरते.
रब्बीसाठी लाभदायक
घसरलेले तापमान हे रब्बीसाठी लाभदायक राहणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी गेल्या १५ दिवसांपासून सुरू केली आहे. गहू व हरभरा या पिकांसाठी हे वातावरण गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी रब्बीच्या पेरणीला गती देत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.