तोरणमाळचा विकास कल्पना नुसती कल्पनाच ठरू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST2021-09-06T04:35:09+5:302021-09-06T04:35:09+5:30
सातपुडा पर्वत रांगेत अतिदुर्गम भागात समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार १०० मीटर उंचीवर नैसर्गिकरित्या धडगाव तालुक्यात तोरणमाळ वसलेले आहे. या ...

तोरणमाळचा विकास कल्पना नुसती कल्पनाच ठरू नये
सातपुडा पर्वत रांगेत अतिदुर्गम भागात समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार १०० मीटर उंचीवर नैसर्गिकरित्या धडगाव तालुक्यात तोरणमाळ वसलेले आहे. या क्षेत्राची धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून ख्याती असल्याने या क्षेत्राचा समावेश राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून झालेला आहे. दुर्दैवाने शासन कुठल्याही पक्षाचे असो शासनाची निष्क्रिय भूमिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे या भागाचा विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, निसर्गाने मुक्त हस्ताने वरदान दिलेले असतानाही केवळ साधन सुविधा नसल्याने या भागाकडे पर्यटकांचा ओढा अत्यल्प आहे. ज्या तुलनेत या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या तुलनेत या भागाची ख्याती देशपातळीवर नसल्याने हे क्षेत्र सातत्याने दुर्लक्षित ठरले आहे.
‘नेहमीच येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दोन-तीन वर्षांतून तोरणमाळ विकासाच्या वल्गना केल्या जातात. विकासाची स्वप्ने दाखविली जातात. मात्र, प्रत्यक्षात विकास झालेला नसल्याने निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ख्याती असलेले तोरणमाळ नावडतीचे मीठ आळणी अथवा नावडतीचा पुत्र म्हणून सातत्याने दुर्लक्षित आहे. तसे पाहिले तर राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री म्हणून आमदार डॉ. विजयकुमार गावीत व आमदार जयकुमार रावल यांनी या भागाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले होते. लोटस नामक एका खाजगी कंपनीमार्फत सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून विकास आराखडा राज्य शासनाला सादर केला होता. तर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. जयंतराव गायकवाड यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी भरती झाल्यानंतर त्यांनीही या विभागाच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. मात्र, नेमकी माशी कुठे शिंकली, हे पर्यटनमंत्री व सचिव यांनी सादर केलेले विकास आराखडे कुठे हरवले, हेच कळेनासे झाले. परिणामी, आजही हा भाग विकासापासून कोसो किलोमीटर दूर आहे.
मागील महिन्यात तोरणमाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, शिवसेनेचे नंदुरबार-धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन स्वतंत्र बैठकीत चौकशी केली. या बैठकीनंतर सुमारे ५१७ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला असून, याला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निधीची तरतूद झाल्यावर या भागात विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती संपर्कप्रमुखांनी दिली. नेमका विकास आराखड्यात या भागातील भौगोलिक क्षेत्रासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा नाही पर्यटकांसाठी नेमके काय करणे गरजेचे आहे. रोजगार वाढीसह येथील पारंपरिक आदिवासी संस्कृतीचे वन संपत्तीचे जतन करून वन्यप्राण्यांना संरक्षण देत त्याची माहिती देशातील पर्यटकांना व्हावी याचाही समावेश या आराखड्यात असणे आवश्यक आहे. तरच या भागाचा विकास जलद गतीने होणे शक्य आहे अन्यथा गेल्या ३० वर्षांपासून राज्य शासन मंत्री व लोकप्रतिनिधी या भागाच्या विकासाची स्वप्ने जिल्ह्यातील नागरिकांना दाखवत आहे. नेहमीप्रमाणे आताही विकासाची कल्पना ही कल्पनाच ठरू नये, एवढीच अपेक्षा.