प्रकाशा परिसरात पिकांची नुकसानभरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:13+5:302021-01-10T04:24:13+5:30
प्रकाशा व परिसरातील डामरखेडा, शेल्टी, करजई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, बोराळा, सुजालपूर, वर्डे-टेंबे, कलमाडी आदी गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेपासून ...

प्रकाशा परिसरात पिकांची नुकसानभरपाईची मागणी
प्रकाशा व परिसरातील डामरखेडा, शेल्टी, करजई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, बोराळा, सुजालपूर, वर्डे-टेंबे, कलमाडी आदी गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेपासून तर शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वादळासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाण्याची डबकी साचली आहेत. याचा फटका रब्बी हंगामातील ज्वारी (दादर), हरभरा, गहू या पिकांना बसला असून, पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतांमध्ये पाण्याचे मोठमोठे डबके साचले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या दीड दिवसात प्रकाशा परिसरात २८ ते ३० मिमी पावसाची नोंद वि. का. सोसायटीच्या पर्जन्यमापकात झाली आहे. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची फुलधारणा झाली होती. मात्र अवकाळी पावसामुळे पिकावरील फूल गळून पडल्याने आता दाणे भरले जाणार नाही, परिणामी उत्पन्नही येणार नाही. सोबत मका व तूर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातही अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होऊन अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आता रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी रामचंद्र दशरथ पाटील, हरी दत्तू पाटील, दिलीप ज्ञानदेव पाटील, गुड्डू सोमभाई पाटील, सुरेश गोरख पाटील, अरुण ओंकार पाटील, अरुण जावरे, महेंद्र भोई यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.