शेतशिवारातील बिघाड झालेला ट्रान्सफार्मर मिळतो सात दिवसांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 15:16 IST2020-12-17T15:16:42+5:302020-12-17T15:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या शहादा व नंदुरबार या दोन विभागात एकूण ५४ हजार वीजजोडण्या ह्या ...

शेतशिवारातील बिघाड झालेला ट्रान्सफार्मर मिळतो सात दिवसांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या शहादा व नंदुरबार या दोन विभागात एकूण ५४ हजार वीजजोडण्या ह्या कृषीपंपधारक शेतक-यांना दिल्या गेल्या आहेत. यासाठी तब्बल २२० मेगावॉट वीज सध्या वापरली जात असून, रब्बी हंगामात हा वापर वाढून ट्रान्सफार्मर नादुरूस्त होण्याच्या समस्याही वाढत आहेत.
जिल्ह्यात शेतशिवारात होणाऱ्या विजेचा पुरवठा करण्यासाठी ३४ मंडळात वीज ट्रान्सफार्मरर्स लावण्यात आली आहेत. साधारण १० ते १०० किलो वॉट क्षमतेच्या ट्रान्सफार्मर्सवरुन शेतकऱ्यांना दिवसाच्यावेळी ११० आणि रात्रीच्या वेळी ११० अशी २२० मेगावॉट वीज पुरवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते ४८ तास ते सात दिवसांच्या आत बदलून दिले जात असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात रब्बी हंगामासाठी विजेचे नियमन करण्यात आले असून, रात्री १० ते सकाळी आठ अशा दहा तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. कंपनीतर्फे दिवस-रात्र शेड्यूलनुसार वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या सर्वच ठिकाणी ट्रान्सफार्मर्स हे चांगले असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतू शेतकरी मात्र वीजेचा दाब कमी असल्याचे सांगत आहेत.
रोहित्र जळाल्याचा ऊस पिकाला बसताेय फटका
शेत शिवारात सध्या ऊस, केळी, पपई ही बागायती पिके तर गहू, हरभरा ही रब्बी पिके आहेत. वीज पुरवठा बंद झाल्यास या पिकांचे नुकसान होते. वीज वितरण कंपनीकडून ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी नेल्यानंतर त्यासाठीचा खर्चही तेच करत असल्याची माहिती शेतक-यांनी दिली.
तक्रार करूनही प्रतिक्षेतच
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतशिवारातील वीज पुरवठा करणा-या ट्रान्सफार्मर्सची स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू ट्रान्सफार्मर्स नादुरूस्त झाल्यानंतर मात्र अनंत अडचणींचा सामना शेतकरी करतात. तक्रारींना उशिरा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे.
नजरेसमोर होते पिकांचे नुकसान
एक ट्रान्सफार्मर येण्यास सात दिवस किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. या काळात केेळी, ऊस तसेच इतर रब्बी पिकांना पाणी देण्याची सुविधा नसल्यास पाण्याअभावी पिक करपत असल्याचे शेतकरी पाहतात. समोर दिसूनही नुकसान सोसता येत नसल्याने ते हलबल होतात.
शेतक-यांना सध्या वेळेवर वीज मिळत आहे. यातून पिकांना पाणी देणे सुरळीत होत आहे. यापूर्वी मात्र अनेक अडचणी येत होत्या. ट्रान्सफार्मर वेळीच मिळण्यास अडचणी होत्या. अद्यापही आहेत. सात दिवसांऐवजी दोन दिवसात ट्रान्सफार्मर देण्याचे नियोजन कंपनीने करावे.
- भगवान देविदास चाैधरी, शेतकरी, मोड ता. तळोदा.
वीज वितरण कंपनीकडून तातडीने कामकाज होते. शेतक-यांच्या तक्रारी निकाली काढण्यावर भर दिला जात आहे. सध्या जिल्ह्यात नादुरूस्त रोहित्रांची संख्या ही अत्यंत कमी आहे. त्यांची दुरूस्तीही तातडीने करुन दिली जात आहे.
- ए.ई.बोरसे, अधिक्षक अभियंता