अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:20+5:302021-01-10T04:24:20+5:30
शहादा तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. शेल्टी, ससदे, टेंभा या ...

अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात पिकांचे नुकसान
शहादा तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. शेल्टी, ससदे, टेंभा या परिसरातील शेतात गुडघ्याएवढे पाणी साचल्याने गहू, हरभरा, केळी, पपईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतांचे बांध फोडून पाण्याचा प्रवाह झाल्याने पिके वाहून गेली आहेत. मगन देवीदास पाटील, डॉ.पी.बी. पाटील, शरद बाबुलाल पाटील, ब्रिजलाल तुमडू पाटील, डॉ.रवींद्र दशरथ पाटील, नितीन नथ्थू पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. वादळ व पावसामुळे गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले, तर हरभऱ्याचे पीकही पाण्याखाली आले आहे. तोडणीवर आलेली केळी व पपईची झाडे जमिनीवर तुटून पडल्याने मोेठे नुकसान झाले आहे.
ऊसतोड मजुरांचे हाल
सातपुडा व पुष्पदंतेश्वर साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांचे वास्तव्य सध्या शेतशिवारात आहे. अवकाळी पावसामुळे या मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच वृद्ध व लहान मुलांचे हाल झाले. या मजुरांची व त्यांच्या कुटुंबांची अवकाळी पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
तालुक्यात शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मंडलनिहाय पावसाची नोंद तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. त्यात शहादा १८, प्रकाशा २८, कलसाडी १६, म्हसावद सात, ब्राह्मणपुरी सात, मंदाणे तीन, वडाळी ११ तर सारंगखेडा मंडळात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रांताधिकारी डाॅ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांना तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, ससदे ते टेंभा रस्त्यावर उसाच्या टिपऱ्यांनी भरलेले ट्रॅक्टर रस्त्यालगत उलटून अपघात झाला. या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून साइडपट्ट्या नसल्याने हा अपघात झाला. त्यात उसाचे व ट्रॅक्टरचे नुकसान झाले.