पावसाच्या सततधारेमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:39 IST2020-08-25T12:39:36+5:302020-08-25T12:39:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळंबू : सलग १५ दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी ...

पावसाच्या सततधारेमुळे पिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबू : सलग १५ दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. हंगामातील कापूस, मका, सोयाबीन, तूर, मूग, उदीड, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या १५ दिवसापासून परिसरात सर्वत्र धो-धो सरी कोसळत असल्याने शेतातील कोळपणी, निंदणी व मशागतीची कामे खोळंबली असून, पाऊस कधी थांबेल या विवंचनेत शेतकरी पडला आहे.
जवळपास १२ ते १५ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे कापूस, मका, सोयाबीन, तूर ही पिके सूर्यप्रकाशाअभावी पिवळी पडून लागली आहेत. दरम्यान, मूग पिकाच्या उभ्या झाडावर असलेल्या तोडणीसाठी आलेल्या परिपक्व शेगांना अती पावसाने कोंबे फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
धो -धो बरसणाऱ्या पावसामुळे शेतातील कोळपणी, निदणीची व पिकातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. आता पाऊस कधी थांबेल या विवंचनेत शेतकरी पडला आहे. तसेच उर्वरीत येणारे सर्व नक्षत्रे ही पावसाची असून, पावसाने उघडीप दिली तरच पिकांची वाढ चांगली होते म्हणून शेतकरी मशागतीच्या कामांसाठी आता पाऊस थांबण्याची वाट पाहात आहेत.
परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या कापूस या नकदी पिकावर मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अती पावसाने कापूस पिकाची पाने पिवळी व लालसर होऊन गळत आहे. काही शेतात पाणी साचल्याने कापसाची झाडे ‘मर’ रोगामुळे काढून घेण्यात येत आहे. या वेळी पिके वाचविण्यासाठी महागातल्या महाग औषधांची फवारणी करूनही पिकांमध्ये सुधारणा होत नसल्याने औषधांचा खर्चही वाया जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. पाऊस व रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संततधारेमुळे भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. कळंबू, ता.शहादा परिसरात लागवड केलेल्या भेंडी, गवार, टमाटे, वांगी या पिकांनाही सततच्या संततधारेमुळे मोठा फटका बसत आहे. या भाजीपाल्याची वेळेत तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.