CoronaVirus News: नातेवाइकांनी पळविले ऑक्सिजन सिलिंडर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 03:00 IST2021-04-08T03:00:01+5:302021-04-08T03:00:14+5:30
नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील प्रकार

CoronaVirus News: नातेवाइकांनी पळविले ऑक्सिजन सिलिंडर!
- रमाकांत पाटील
नंदुरबार : टंचाईग्रस्त गावात पाण्याचे टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी अख्खं गाव तुटून पडतं हे चित्र आपण नेहमीच अनुभवले आहे. आता तसेच चित्र ऑक्सिजन सिलिंडरच्या गाडीबाबत झाले आहे. बुधवारी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ही गाडी येऊन उभी राहत नाही, तोच रुग्णांचे नातेवाईक या गाडीतील सिलिंडर पळविण्यासाठी अक्षरश: तुटून पडले.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आठ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण वाढले असून, चार दिवसांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प असून, त्याद्वारे रोज २५० सिलिंडर ऑक्सिजन तयार होतो. मात्र, वाढत्या रुग्णांमुळे ते कमी पडत असल्याने रोज धुळ्याहून १५० सिलिंडर मागविले जातात. हे सिलिंडर एका मोठ्या व्हॅनमध्ये भरून येतात.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही व्हॅन येऊन उभी राहत नाही तोच त्याच्या प्रतीक्षेत असलेले कोरोना रुग्णांचे नातेवाईक अचानक व्हॅनभोवती गोळा झाले आणि व्हॅनमधून थेट सिलिंडर घेऊन गेले. तब्बल ५० किलोपेक्षा अधिक वजनाचे सिलिंडर उचलता येत नसले तरी ओढून घेऊन ते जात होते. रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या ते लक्षात येताच त्यांनी मध्यस्थी करून कसे तरी हा गोंधळ थांबविला.
रुग्णालयातील घटनेची गंभीर दखल घेतली असून, योग्य नियोजन केले आहे. रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
- डाॅ. के. डी. सातपुते, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार