कोरोनाच्या मृत्युमुळे यंदा अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा खर्च झाला दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:30+5:302021-02-25T04:39:30+5:30
नंदुरबार : कोरोना तसेच इतर कारणांमुळे शहरासह परिसरात गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या वाढल्याने व त्या अनुषंगाने नंदुरबारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचीही ...

कोरोनाच्या मृत्युमुळे यंदा अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा खर्च झाला दुप्पट
नंदुरबार : कोरोना तसेच इतर कारणांमुळे शहरासह परिसरात गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या वाढल्याने व त्या अनुषंगाने नंदुरबारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचीही संख्या वाढल्याने गेल्या वर्षभरात पालिकेला दुप्पट जळाऊ लाकूड लागले आहे. त्यामुळे पालिकेला दहा लाखांची करावी लागलेली खर्च मर्यादा वाढवून ती २० लाख रुपये करावी लागत आहे.
गेल्या वर्षभरात कोरोना तसेच इतर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नंदुरबारच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण देखील वाढल्याचे गेल्या वर्षभरात दिसून आले. त्यामुळे पालिकेला अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या जळाऊ लाकडांचा खर्च जवळपास दहा लाखांनी वाढला असल्याचे चित्र आहे.
नंदुरबार पालिकेतर्फे पालिकेच्या स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड पुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. साधारणत: दहा लाखांचा खर्च त्यासाठी केला जात असतो. तेव्हढ्या खर्चाच्या लाकडात वर्षभर निभावून नेले जाते. येथे होणाऱ्या सरासरी अंत्यसंस्काराच्या मर्यादेनुसार हा लाकूड पुरवठा केला जात असतो.
यंदा मात्र, दुप्पट लाकूड
यंदा पालिकेच्या स्मशानभूमीत दुप्पट लाकूड लागल्याचे चित्र आहे. त्याचा खर्च १५ लाखांपेक्षा अधिक गेला आहे. हा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे. अर्थात मानवतेच्या दृष्टकोनातून पालिकेने घेतलेला हा निर्णय असल्यामुळे अतिरिक्त खर्चाबाबत पालिकेने झळ सोसण्याची मानसिकता करून घेतली आहे.
अनेक वर्षांपासूनची सेवा
पालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा सुरू ठेवली आहे. सामान्य कुटुंबासह उच्च वर्गीय कुटुंबांचीही अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकूड खर्चापासून सुटका झाली आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च मोठा असतो.
शिवाय शहरी भागात लाकूड मिळविण्यासाठी मोठी कसरत असते. अशावेळी मोफत लाकूड मिळाल्यास त्याला मोठा दिलासा मिळतो. पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक सामन्य कुटुंबांची आर्थिक बचतदेखील झाली आहे.
कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर मोफत अंत्यसंस्कार...
n कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर पालिकेने मोफत अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी पालिकेच्या जुन्या स्मशानभूमीत अग्नीदाहची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी देखील जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गीत व संशयित अशा जवळपास ३२५ पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत.
नंदुरबार पालिकेतर्फे मानवतेच्या दृष्टिकोनातून अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड पुरवठा केला जातो. वर्षभरात जिल्हाभरातील कोरोनामुळे व कोरोना संशयितांचे अंत्यसंस्कार पालिकेच्या स्मशानभूमीत मोफत केले गेले. त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या. त्यामुळे यंदा लाकूड जास्त लागले. यापुढील काळात वीज दाहिनीचा विचार असून त्यासाठी प्राथमिक स्तरावर चाचपणी केली जात आहे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,
नगराध्यक्षा, नंदुरबार.