तळोदा तालुक्यातील २८ गावांनी कोरोनाला रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:01+5:302021-05-11T04:32:01+5:30
तळोदा तालुक्यात ६७ गावे आहेत. बहुतांश गावे सातपुड्याच्या दुर्गम भागात आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास ९० टक्के गावांमध्ये कोरोना ...

तळोदा तालुक्यातील २८ गावांनी कोरोनाला रोखले
तळोदा तालुक्यात ६७ गावे आहेत. बहुतांश गावे सातपुड्याच्या दुर्गम भागात आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास ९० टक्के गावांमध्ये कोरोना पोहचलेला नव्हता. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गावे त्यातही अतिशय नगण्य बधितांची संख्या होती. तळोदा शहारापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दस्तक घातली आहे. अगदी सातपुड्यातील मालदा, राणीपूर, रांझणी, प्रतापपूर, चिनोदासारखी गावे अक्षरश: हॉटस्पॉट ठरली होती. मालदा या गावाने तर शंभरी पार केली आहे. त्यानंतर राणीपूर येथे पन्नासची संख्या आढळून आली आहे. काही गावांमध्ये २० ते २५ पेक्षा अधिक संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. तथापि, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने निर्जंतुकीकरण, आरोग्य तपासणी, कन्टेन्मेंट झोनची कडक उपाययोजनांची अंमबजावणी यामुळे तत्काळ तो आटोक्यात आला आहे. यातील काही गावांमध्ये मृत्यूही वाढले आहेत.
लाट आली पण ग्रामस्थांनी त्यावर मातही केली
तळोदा तालुक्यातील मालदा हे गाव सातपुड्यातील दुर्गम भागात वसले आहे. गावाची लोकसंख्या एक हजार ७४० आहे. सुरुवातीला गावात सर्दी, ताप, खोकला या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली होती. त्यात तब्बल १०६ रुग्ण आढळून आले. या रुग्णांसाठी गावात विलगीकरण कक्ष उभारण्यात आला होता. त्यानंतर एकही रुग्ण निघाला नाही. शिवाय गंभीर रुग्णही नाहीत. यातील जवळपास सर्वच जण बरे होऊन घरी परतले आहेत.
राणीपूर हे गावदेखील सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. दुसऱ्या लाटेत गावास कवेत घेतले होते. येथेही ४५ रुग्ण आढळून आले होते. शिवाय येथे मृत्यूदेखील झाले आहेत. ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना केल्यामुळे बाधितांची संख्या कमी झाली. मात्र भीती कायम आहे.
रांझणी गावातही ३५ बाधित झाले होते. साहजिकच गावात मोठी खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी स्वयंशिस्त पाळल्याने साथ आटोक्यात आणण्यात यश आले. तथापि, आजही उपाययोजना कायम आहेत.
शहरापासून जवळच असलेल्या आमलाड गावात कोरोनाच्या पहिल्या लाटेतही रुग्ण निघाले होते. आता दुसऱ्या लाटेने गाव प्रभावित झाले आहे. गावाची लोकसंख्या तीन हजार ३३७ आहे. गावात ३० जण बाधित झाले होते. येथेही विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. तेथे बधितांवर उपचार केल्यानंतर सर्व बरे झाले आहेत.
बोरद गाव तालुक्यात सर्वात मोठे आहे. गावाची लोकसंख्या साधारणत: सात हजार एवढी आहे. एवढ्या मोठ्या गावात पहिल्या टप्प्यात तुरळक बाधित होते. मात्र दुसऱ्या लाटेने गावात शिरकाव केला. सध्या २७ बाधित होते. गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी आहे. उपाययोजना व शासनाच्या आदेशाचे कडक पालन यामुळे साथ पसरली नाही.
सोमावल पहिले गाव ठरले
कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सोमावल गावात पहिला रुग्ण रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत गावाच्या स्वयंशिस्तीमुळे कोरोनाला बाहेर ठेवले आहेत. तालुक्यातील पूर्वभागातील गावांमध्ये कोरोनाची झळ बसली असून साधारण १५ गावे आहेत. त्या तुलनेत पश्चिम भागात बोटावर मोजण्याइतकेच गावात बाधित आहेत. तेही दहापेक्षा जास्त नाहीत.
तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य गावांनी कोरोनाला वेशीवर टाकले आहे. अर्थात, शासनाच्या आदेशाची ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे केलेली अंमलबजाणी शिवाय तेथील नागरिकांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे आतापावेतो या महामारीवर मात केली आहे. नागरिकांनी यापुढेही दक्षता घेणे गरजेचे आहे.
बी.के पाटील, विस्तार अधिकारी, पं.स. तळोदा