Corona warriors, don't give up for a few more days! | कोरोना योद्धांनो, अजून काही दिवस संयम सोडू नका!

कोरोना योद्धांनो, अजून काही दिवस संयम सोडू नका!

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संकटाच्या काळात जो मदतीला धावून येतो त्यालाच देव मानण्याची मानवी प्रवृत्ती आहे. असे देव कोरोना महामारीच्या काळात वेगवेगळ्या रुपात लोकांना भेटले. कधी डॉक्टर म्हणून, कधी पोलीस म्हणून, कधी परिचारिका म्हणून, कधी वाटाड्याच्या रुपात, कधी मदतीला धावून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या रुपात... अशा अनेक चेहऱ्यात लोकांनी देव पाहिला. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसºया टप्प्यात पोलीस दलातील कर्मचारी आणि आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर लोकांनी अक्षरश: फुलांची उधळण केली. रस्त्यावर लाठीने धो-धो धुतल्यानंतरही पोलिसांना लोकांनी देवाच्या रुपात पाहिले. पण हे चित्र मात्र आता बदलते आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आणि लॉकडाऊनची शिथीलता सुरू असतानाचे हे चित्र निश्चितच आशादायी नाही. कुठे तरी सातत्याने काम करणाºया यंत्रणेचाही संयम सुटतोय आणि शिथीलतेमुळे कामानिमित्त बाहेर फिरणाºया जनतेलाही त्याचा अनुभव येत आहे. अनेकवेळा लोकांचाही तोल जात आहे. त्यामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनीच आपला संयम टिकवून ठेवण्याची गरज असून दोन महिन्यापूर्वी दिसणाºया माणसातील देवपणदेखील टिकवून ठेवण्याची गरज आहे.
नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण जवळपास नाहीच्या बरोबर होते. पण या काळात लॉकडाऊनचे नियम मात्र कठोरतेने पाळले गेले. प्रशासनाच्या उपाययोजना प्रभावी ठरल्या. लोकांनीही वाहवा केली. पण आता जसजसा कालावधी वाढत आहे तसतसे रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा स्थितीत मात्र कुठेतरी यंत्रणेतील समन्वय, संयम आणि सहनशीलता संपत चालल्यागत अनुभव येत आहे. एकीकडे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना प्रशासन आणि जनता यांच्यातील काही प्रमाणात दुरावा वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरातील अनेक घटना त्याचे उदाहरण म्हणता येईल. क्वारंटाईन केंद्रातील सुविधांबाबत लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक जण त्याबाबतचे केंद्रातून आपले व्हीडीओ व्हायरल करीत आहेत. सोयी-सुविधा मिळत नसल्याने हे लोक सोशल मिडीयातून आपले प्रश्न लोकांसमोर मांडत आहेत. कधी स्वच्छतेचा प्रश्न, कधी निकृष्ट जेवणाचा प्रश्न, कधी पाण्याचा प्रश्न, कधी अनेक दिवस लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न, स्वॅब घेण्यातील दिरंगाई असे कितीतरी प्रश्न लोक क्वारंटाईन सेंटरमधून प्रशासन आणि लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व समस्या सांगितल्या जातात, तशा आहेच असेदेखील म्हणता येणार नाही. अनेकवेळा क्वारंटाईन झालेल्या लोकांना घरी जाण्याची घाई असते. त्यातूनही केल्या जात असल्याच्या उलट तक्रारीदेखील आहेत. पण त्यातून क्वारंटाईन झालेले लोक आणि प्रशासन यांच्यात मतभेद होत असल्याचे चित्र निश्चित रोजचे समोर येत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या तरुणीचा रुग्णालयातीलच एका कर्मचाºयाने विनयभंग केल्याची घटनाही समोर आली आहे. यासंदर्भात गुन्हादेखील दाखल झाला आहे. रुग्णांचे स्वॅब घेण्यात मधल्या काळात दिरंगाई झाल्याने त्याचाही बाऊ झाला होता. बुधवारीच काही रुग्णांचे स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याची प्रक्रिया सुरू असताना या रुग्णांना अर्धा दिवस रुग्णवाहिकेतून या-ना त्या ठिकाणी फिरविल्याचा प्रकारही समोर आला.
केवळ आरोग्य विभागातच नव्हे तर पोलीस दलाचेही असे अनुभव लोक घेत आहेत. रस्त्यावर चार-चार सीट दुचाकी उडविणारे तरुण बिनदिक्कत फिरतात, त्यावर कारवाई होत नाही पण एखादा शासकीय व निमशासकीय कार्यालयात जाणाºया कर्मचाऱ्यांना अडवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा चौकाचौकात उभे असलेले पोलीस दाखवत आहेत. जे लोक पूर्णपणे नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्याकडे कानाडोळा करून नियमांचे पालन करणाºया लोकांवर कारवाई बडगा दाखवला जात आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातील अनेक लोक कामानिमित्त दुचाकीने येत आहेत. प्रत्येकाजवळच कागदपत्रांची ऐनवेळी उपलब्धता असतेच असे नाही. कायद्याचे जरुर पालन झाले पाहिजे पण त्यासाठीही वाहनधारकांशी माणुसकीच्या नात्याने संवाद साधला गेला पाहिजे. सध्या पोलीस दलातील कर्मचारी वाहनधारकांशी अतिशय उद्धटपणे व मुजोरीने संवाद साधत असल्याचे चित्र आहे. असे कितीतरी अनुभव रोज लोक घेत आहेत. रस्त्यावर बिनदिक्कतपणे तोंडावर मास्क न लावता फिरणारे लोकांना कोणी सूचना करीत नाही. पण आपल्या कार्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी, दुकानात तोंडावरचा मास्क खाली करून काम करणाºया लोकांना मात्र कारवाईचा इशारा देण्यासाठी प्रशासनाचे लोक त्यांच्या दालनात जातात. अर्थात नियम सर्वांनीच पाळले पाहिजे याबाबत दुमत नाही. पण बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करणाºयांवर प्रशासनाचा धाक निर्माण होणेही गरजेचे आहे.
एकूणच चित्र पाहता सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अशा परिस्थितीत सर्वांनीच गांभीर्य व काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. लोकांनीदेखील त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासन आणि जनतेत सुसंवादाची गरज आहे. पण नेमक्या याच परिस्थितीत विसंवाद वाढत आहे, तक्रारींचा पाढा वाढतो आहे. ही बाब निश्चितच चांगली नाही. सलग चार महिने महामारीच्या या अभूतपूर्व प्रसंगात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचीही मानसिकतेची जाणीव लोकांनीही ठेवली पाहिजे. तर दुसरीकडे प्रशासनानेही ज्या लोकांनी आपल्याला देव बनविले त्यांच्या भावनेची कदर करीत अजून काही दिवस संयम ठेवण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Corona warriors, don't give up for a few more days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.