यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:51+5:302021-07-25T04:25:51+5:30
मूर्तिकार आणि कारागिरांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना त्याचे आर्थिक, सामाजिक परिणामही समोर ...

यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट
मूर्तिकार आणि कारागिरांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना त्याचे आर्थिक, सामाजिक परिणामही समोर येत आहेत. या व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झाल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसायांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदाही सरकारने सार्वजनिक मंडळांची गणेशमूर्ती चार फूट, तर घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत असावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक गणेशभक्त घरीच पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मूर्तिकारांकडे गणेश मूर्तींची मागणी कमी असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने मूर्तिकारांना काही प्रमाणात का होईना आर्थिक मदत करावी किंवा नियमांत शिथिलता आणावी, अशी मागणी आता मूर्तिकारांकडून करण्यात येत आहे.
कोरोनापूर्वी गणपतीची मूर्ती घडविण्याची कला पाहण्यासाठी गणेश भक्तांच्या रांगा लागत असत, तसेच आपल्या मंडळांच्या मूर्तीला आवडीनुसार रंगरंगोटी करण्यास मूर्तिकारांना सांगून धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात असे. कोरोना संकटामुळे गर्दी होऊ नये म्हणून सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घातले. सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूट, तर घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत असावी, असे निर्देश केले. या नियमावलीमुळे गणेश मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात गणेश भक्तांनी दीड ते दोन फूट उंचीची मूर्ती तयार करीत तिची स्थापना करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे कारागिरांनी बनविलेल्या मूर्तीची यंदाही विक्री होण्याची शक्यता कमी असल्याने कारागीर धास्तावले आहेत.
कुटुंब पोसायचे कसे?
परंपरागत व्यवसायातून मूर्तिकार व कारागिरांच्या कुटुंबाचे वर्षातील आर्थिक नियोजन होत असते; परंतु सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत गणेश मूर्तींची जास्त मागणी नसल्याने कारागिरांना काम देणे परवडत नसल्याने या कलाकारांचे हात रिकामे दिसतात. मूर्ती कारखान्यात मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर उदासीनता पाहायला मिळाली. या आपत्तीत मूर्ती विक्री व्यवसाय संकटात आला आहे.
कोरोना विषाणूच्या सावटामुळे आम्हा मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जीवन जगणं आता कठीण होत चाललेय. अशा परिस्थितीत आम्हा मूर्तिकारांना काही प्रमाणात का होईना सरकारने आर्थिक मदत करायला हवी, अशीच अपेक्षा आम्ही बाळगत आहोत.
- दशरथ कुंभार, मूर्तिकार, तळोदा