कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:14 IST2021-01-12T12:14:21+5:302021-01-12T12:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : २००६ मधील बर्ड फ्ल्यूच्या कटू आठवणींची धास्ती जिल्हावासीयांनी पुन्हा घेतली आहे. चिकन विक्रीवर १५ ...

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धसका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : २००६ मधील बर्ड फ्ल्यूच्या कटू आठवणींची धास्ती जिल्हावासीयांनी पुन्हा घेतली आहे. चिकन विक्रीवर १५ ते २० टक्के परिणाम झाला आहे. पोल्ट्रीधारकांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा कुठलाही धोका नाही. त्यामुळे अफवा पसरवू नये. जिल्हा प्रशासनाचे या बाबीकडे लक्ष असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात २००६ मध्ये बर्ड फ्ल्यू आला होता त्यावेळी नवापूरसह जिल्ह्यातील अनेक पोल्ट्रीमधील पक्षी दगावले होते. त्यातून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. साधारणत: वर्षभर हा व्यवसाय रुळावर येण्यास लागला होता. आता देखील देशातील काही राज्यात बर्ड फ्ल्यूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात देखील त्याबाबत सतर्कता बाळगली जात आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने त्यासाठी पोल्ट्रीधारकांना आवाहन केले आहे. आवश्यक त्या उपाययोजना करणे आणि तशी काही लक्षणे आढळल्यास तातडीने कळविण्याचे सुचीत केले आहे. जिल्हावासीयांनी देखील याबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नये. दरम्यान, चिकन व अंडी विक्रीवर काहीसा परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवतो. परंतु, तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस १६५ अंशावर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. पोल्ट्री धारकांना वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात सात शिघ्रकृती दले स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात धोका नाही. तरीही काळजी घ्यावी. १०० टक्के जैव सुरक्षा पाळावी. सर्व पोल्ट्रीचालकांना आवश्यक त्या सुचना दिलेल्या आहेत.
-डॅा. उमेश पाटील, जी.प.पशुसंवर्धन अधिकारी
मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा
आपल्या परिसरात मृत पक्षी आढळल्यास त्याला खोल खड्डयात बुजवावे. त्यासाठी आवश्यक त्या जंतूनाशक पावडरचा, औषधांचा वापर करावा. एकाच वेळी जास्त पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यास तातडीने जवळच्या पशुचिकित्सालयात संपर्क साधावा. मृत पक्ष्यांना हाताळू नये. त्यासाठी ग्लोव्हजचा व मास्कचा वापर करावा.