अकरावी प्रवेश-टक्का वाढल्याने राहील स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:43 IST2020-08-03T12:43:14+5:302020-08-03T12:43:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी निकालाचा टक्का यंदा वाढला आहे. अकरावी प्रवेशासाठी आता तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात ...

अकरावी प्रवेश-टक्का वाढल्याने राहील स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावी निकालाचा टक्का यंदा वाढला आहे. अकरावी प्रवेशासाठी आता तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात अकरावीच्या तुकड्या लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल अशी स्थिती असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणने आहे. असे असले तरी यंदा विद्यार्थ्यांना वाढलेल्या टक्केवारीमुळे प्रवेशासाठी स्पर्धा राहणार हे मात्र नक्की. त्यासाठी शिक्षण विभागाला अशा कनिष्ठ महाविद्यालयांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात अकरावीच्या १६,३२० जागा असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८,३७८ इतकी आहे.
दहाीचा आॅनलाईन निकाल नुकताच लागला आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा राहणार आहे. लवकरच अकरावी वर्गाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. दरवर्षी अकरावीच्या विज्ञान वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते.
यंदाही ते चित्र कायम राहणार आहे. चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी विद्यार्थ्यांचा कल अशा ठिकाणी राहण्याची शक्यता कायम आहे. दहावीनंतर इतर शाखांकडे जाणाऱ्यांची संख्या अतिशय कमी असते.
बारावीनंतरच इतर शाखांकडे जाण्याची ओढ असते. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना ११ व १२ वी करण्यास उद्युक्त करतात. परिणामी अकरावी प्रवेशासाठी मोठी चढाओढ असते. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील मोजक्याच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचा कल असतो. अशा ठिकाणी मोठी स्पर्धा असते. परिणामी मेरीट देखील वाढलेले असते. अशा महाविद्यालयांमध्ये मग जादा तुकडीचे फॅड तयार होऊन त्याद्वारे विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क उकळले जाते.
कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या
जिल्ह्यात एकुण ७६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात सर्वाधिक नंदुरबार तालुक्यात तर सर्वात कमी धडगाव तालुक्यात आहे. नंदुरबार तालुक्यात २१ अनुदानीत तर सात विनाअनुदानीत/ स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण २८ आहेत.
नवापूर तालुक्यात नऊ अनुदानीत व तीन विनाअनुदानीत असे एकुण १२, शहादा तालुक्यात १५ अनुदानीत व पाच विनाअनुदानीत किंवा स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण २० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तळोदा तालुक्यात चार अनुदानीत व दोन विनाअनुदानीत असे सहा, अक्कलकुवा तालुक्यात तीन अनुदानीत व पाच विनाअनुदानीत असे एकुण आठ तर धडगाव तालुक्यात एक अनुदानीत व एक विना अनुदानीत असे एकुण दोन कनिष्ठ महाविद्यालय आहेत. एकुण ५३ अनुदानीत व २३ विना अनुदानीत/ स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण ७६ कनिष्ठ महाविद्यालये जिल्ह्यात आहेत.
प्रवेश प्रक्रिया तर राबविली जाईल, परंतु प्रत्यक्षात शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला तरी घरूनच अभ्यास करावा लागणार आहे.
प्रवेश प्रक्रिया देखील कोरोनाचे सर्व नियम पाळत, विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कला शाखेची यंदाही पंचायत
विज्ञान शाखेकडे असलेला कल लक्षात घेता कला शाखेला दरवर्षी विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत करावी लागते. यंदाही ती परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कला शाखेच्या अनुदानीत, विनाअनुदानीत अशा एकुण ९३ तुकड्या आहेत. त्यामुळे तुकड्या टिकविण्यासाठी संस्थाचालकांची आणि शिक्षकांचीही कसरत होत आहे. परिणामी गावोगावी शिक्षकांना फिरावे लागत आहे. विद्यार्थ्यांना गोळा करावे लागते. विद्यार्थ्यांची पास काढणे, त्यांचे प्रवेश करून देणे असे प्रकार करावे लागतात.
विज्ञान शाखेकडे कल
विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल यंदाही राहणार आहे. विज्ञान शाखेच्या तुकड्यांची संख्या ८३ आहे. त्यात ३२ अनुदानीत, ४२ विना अनुदानीत, एक कायम विनाअनुदानीत तर आठ स्वयंअर्थसहाय्यीत तुकड्या आहेत. विज्ञान शाखेत एकुण ७,१२० जागा आहेत.
वाणिज्य व संयुक्त
वाणिज्य व संयुक्त विभागाकडे जाण्याचा कल कमी राहत असल्याने या विभागाच्या तुकड्या व जागाही कमी असतात. वाणिज्यच्या ६८० तर संयुक्तच्या ४४० जागा आहेत.