केदारेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:37 IST2020-06-09T12:24:53+5:302020-06-09T12:37:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसर पंपाद्वारे सॅनिटायझर करण्यात आला. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिराच्या ...

Cleaning of Kedareshwar temple premises | केदारेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

केदारेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसर पंपाद्वारे सॅनिटायझर करण्यात आला. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वयंचलित सॅनिटायझर फवारणी यंत्र बसविण्यात येणार असून त्याची तयारी सुरू आहे.
प्रकाशा हे दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. येथे भारतभरातून भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने मंदिर बंद आहे. प्रकाशा परिसरात एकही कोरोना रुग्ण अद्याप आढळून आला नाही. म्हणून काही अटीशर्तीवर केदारेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी मंदिराचे मुख्य विश्वस्त रामचंद्र पाटील, पुजारी व भाविकांनी केली आहे.
मंदिर खुले करण्यासाठी पूर्वतयारीसाठी केदारेश्वर मंदिराचे मुख्य ट्रस्टी रामचंद्र पाटील, सदस्य तुकाराम पाटील, गजानन भोई, रमेश साळी, गुरव पुजारी गोरख गुरव, रवींद्र गुरव, रामचंद्र गुरव, गोकूळ गुरव, नरेंद्र गुरव, नीलेश गुरव, दीपक देशपांडे आदींनी चर्चा केली. मंदिर खुले करण्यासाठी दर्शनासाठी परवानगी मिळेल तेव्हा मिळेल मात्र त्याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापासून उपयोजना करणे गरजेचे आहे. त्यानुसार केदारेश्वर मंदिराचा परिसर साफसफाई करून संपूर्ण मंदिराला सॅनिटायझर करण्यात आले. तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची सुरक्षा व्हावी म्हणून केदारेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित सॅनिटायझर फवारणी यंत्र बसवण्यासाठी तयारी सुरू आहे. मंदिराच्या ट्रस्टींच्या उपस्थितीत हे स्वयंचलित यंत्र कुठे कार्यान्वित करावे याबाबत जागा ठरवून चर्चा करण्यात आली. मंदिरातील सर्व घंटा कापडाने बांधून देण्यात आल्या. जेणेकरून कळत-नकळत त्याला कोणाचे हात लागू नये. ८० दिवसांपासून मंदिर बंद अवस्थेत होते म्हणून आज मंदिर व सभा मंडपात स्वच्छता करून साफसफाई करण्यात आली.
शासनाच्या परवानगीनंतर प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरासह इतर मंदिरे व परिसर साफसफाई करून दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत.

राज्य शासनाने मंदिर उघडण्यास बंदी केली आहे. मात्र त्याआधीच मंदिराबाहेर स्वयंचलित सॅनिटायझर फवारणी यंत्र बसवण्यासाठी मोजमाप करण्यात आले. ८० दिवसांपासून मंदिर बंद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अटीशर्तीवर प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर उघडण्यासाठी परवानगी द्यावी.
-रामचंद्र दशरथ पाटील, मुख्य विश्वस्त, केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, प्रकाशा.

Web Title: Cleaning of Kedareshwar temple premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.