चांदसैली घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:38+5:302021-08-25T04:35:38+5:30

चांदसैली घाट हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक परंतु प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरडी ...

In Chandsaili Ghat, the pain collapsed, the traffic was disrupted, the lives of the passengers were hanging | चांदसैली घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा जीव टांगणीला

चांदसैली घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा जीव टांगणीला

चांदसैली घाट हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक परंतु प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे बऱ्याचदा घाट मार्गातील वाहतूक बंद होते. मंगळवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास कोठार ते चांदसैली दरम्यान असलेल्या रस्त्यालगत ही दरड कोसळली. यामुळे रस्त्यावर दगड-मातीचा ढिगारा तयार झाला व त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. सकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर नंदुरबार, तळोदा येथून धडगाव येथे नोकरी व व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांचा खोळंबा झाला. काही वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील मोठ-मोठे दगड ढकलून बाजूला केले. मातीही बाजूला करीत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अखेर १२ वाजेच्या सुमारास रस्त्यावरील माती व दगड दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कोसळलेल्या दरडीसोबत मोठमोठे दगड रस्त्यालगत पडले आहेत. यातील काही मोठे दगड रस्त्यावर घरंगळत गेले. दरड कोसळताना त्या ठिकाणाहून एखादे वाहन मार्गक्रमण करीत असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. सकाळची वेळ असल्याने घाटात वाहनधारकांची संख्या कमी होती.

दरम्यान, चांदसैली घाट सातपुड्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागाला जिल्हा मुख्यालयाला जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे अनेक जण धडगाव येथे जाताना व येताना वेळ, श्रम व इंधनाची बचत होत असल्याने चांदसैली घाटमार्गाने जाणे पसंत करतात; मात्र या घाटात पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे भगदाड पडलेले आहेत. खचणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व रस्ता खचू नये यासाठी भराव तसेच संरक्षक भिंत बांधण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांची कामे संबंधित विभागामार्फत केली जातात. नागमोडी वळणे, खोल दरी, अरुंद रस्ता यामुळे चांदसैली घाटात वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्त्यावर कोसळलेल्या दरडी, तीव्र चढाव व उतार, खचलेला रस्ता, रस्त्यावर माती व चिखल, ठिकठिकाणी असलेला संरक्षक कठड्याचा अभाव व दुरवस्था यामुळे घाटातील वाट अधिक बिकट बनली आहे. या सर्व प्रकारामुळे वाहनधारकांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तारेवरची कसरत करीत वाहनधारकांना घाटमार्गात वाहने मार्गस्थ करावी लागत असतात.

Web Title: In Chandsaili Ghat, the pain collapsed, the traffic was disrupted, the lives of the passengers were hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.