बालरोगतज्ज्ञांअभावी तिसरी लाट रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:25+5:302021-05-28T04:23:25+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊन जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना नियंत्रण एकीकडे सुरू असताना आरोग्य ...

Challenge to the administration to prevent the third wave due to lack of pediatricians | बालरोगतज्ज्ञांअभावी तिसरी लाट रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान

बालरोगतज्ज्ञांअभावी तिसरी लाट रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊन जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना नियंत्रण एकीकडे सुरू असताना आरोग्य प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेचे नियोजनही करत आहेत. परंतु यासाठी लागणारे बालरोग तज्ज्ञांची संख्या कमीच असल्याने संभाव्य नियोजन करणे आव्हानात्मक ठरणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयाची भूमिका मोलाची ठरली होती. सतत वाढत गेलेले बेड, ऑक्सिजन प्लँट, औषधींचा पुरवठा यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ही अत्यंत कमी झाल्याचे दिसून येत आहे. हीच गत जिल्ह्यातील खासगी, उपजिल्हा, ग्रामीण आणि कोविड केअर सेंटर्समध्ये दिसून येत आहे. दरम्यान कोरोना रुग्ण संख्या घटली असली तरी आयसीएमआरने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात ० ते १० आणि ११ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास काय, असा प्रश्न आहे. परंतु यातून मार्ग काढत आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कक्षांची निर्मिती होणार आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये कक्ष तयारीला वेग आला आहे.

ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभाग सक्रिय

नंदुरबार जिल्हा हा प्रामुख्याने कुपोषणाच्या समस्येमुळे ओळखला जातो. सातपुड्याच्या दुर्गम भागातील हे कुपोषण बालकांना कोरोनामुळे अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने आरोग्य प्रशासनाने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. सपाटीच्या चार तालुक्यात ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, परिचारिका तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून तपासणी व सर्वेक्षण होणार असल्याचे समजते. ग्रामीण भागात कोरोनापासून लांब राहण्याच्या उपाययोजना सातत्याने सांगण्यात येत आहेत. लहान बालकांची काळजी कशी घ्यावी तसेच कोणती लक्षणे असू शकतात. याची माहिती देण्यात येत आहे. यातून ग्रामीण भागात जागृती होत असल्याचे सांगण्यात येत आहे. लहान बालकांना कोरोनाचा धोका कमीच असल्याचा दावाही आरोग्य विभाग करत आहे.

१५० बेडचे रुग्णालय सज्ज

जिल्ह्यातील संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार जिल्हा रुग्णालयात १५० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी औषधी देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सही येथे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबत तळोदा आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालयातही कक्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सर्वेक्षण होणार

जिल्ह्यातील ० ते १० आणि ११ ते १८ या वयोगटातील नवजात बालके, लहान मुले, किशोरवयीन मुले-मुली यांची योग्य ती संख्या समोर येण्यासाठी सर्वेक्षण होणार आहे. बालविकास विभाग, प्राथमिक व शिक्षण विभागाकडून मुलांची संख्या घेतली जात आहे.

तिसरी लाट आल्यास त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. जिल्हा रुग्णालयात १५० खाटांचा बेड तयार आहे. आपल्याकडे बालरोगतज्ज्ञ नियुक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित परिचारिका यांची संख्या वाढवली आहे. चांगल्या आणि सुसज्ज अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

-डाॅ. आर.डी. भोये, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार

Web Title: Challenge to the administration to prevent the third wave due to lack of pediatricians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.