पुसनद येथील ३५० वर्षाचा लळीत उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:18 IST2020-08-28T13:18:01+5:302020-08-28T13:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : भारतीय संस्कृतीत प्रत्येक राज्यात व गावात आपली स्वत:ची एक सांस्कृतिक ओळख असते. परंतु कोरोना ...

पुसनद येथील ३५० वर्षाचा लळीत उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : भारतीय संस्कृतीत प्रत्येक राज्यात व गावात आपली स्वत:ची एक सांस्कृतिक ओळख असते. परंतु कोरोना महामारीमुळे सर्व क्षेत्रात त्याचा विपरीत परिणाम झाला. सांस्कृतिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला असून तालुक्यातील पुसनद येथील ३५० वर्षांची परंपरा असलेला लळीत उत्सव प्रथमच अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
तालुक्यातील धुरखेडा, पुसनद, म्हसावद, सारंगखेडा आदी गावांमध्ये लळीत उत्सवाची परंपरा श्री स्वामी नित्यानंदानी चालू केली. पुढे ती परंपरा धुरखेडा, म्हसावद येथे खंडित झाली. पुसनद व सारंगखेडा येथे मात्र अद्यापही लळीत उत्सवची परंपरा चालू आहे. लळीत उत्सवाची परंपरा नव्या पिढीला मार्गदर्शक ठरते. पुसनद येथील ३५० वर्षापासून चालू असलेली लळीत परंपरा यंदा अतिशय साध्या स्वरूपात शासनाचे नियम पाळून साजरी झाली. त्यात उत्साह मात्र पूर्वीसारखा दिसला नाही. श्री नित्यानंद स्वामी महाराज यांनी पुसनद गावाला ही लळीत प्रसादाची परंपरा आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषेनुसार लळीताचा कार्यक्रम गावातील सर्व जाती-जमातीचे ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. सायंकाळी सुरु झालेला हा उत्सव दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत सुरू असतो. प्रसादाच्या रूपात, पोथीचे व पौराणिक प्रसंगाचे व्यक्ती गायन-वादन, अभिनयाद्वारे प्रसंगाचे सादरीकरण केले जाते. पौराणिक प्रसंगानुरूप विविध नाटकांचे वेशभूषेसह सादरीकरण यास लळीत उत्सव म्हटले जाते. गावातील चौकात किंवा मंदिराच्या प्रागंणात रंगमंचाद्वारे सादरीकरण केले जाते. रात्रभर जळत्या मशालीच्या उजेडात सजवलेल्या रंगमंचावर पौराणिक प्रसंगाचे सादरीकरण केले जाते. रासलीला या रूपातून धार्मिक अनुष्ठान व मानवी जीवनातील सुखदु:ख प्रसंगाचे पुरुषांकडून राग पदे गायली जातात. परिसरातील गावांमध्ये ही पदे म्हणणारी खास रास गायन मंडळी असतात. झांज, टाळ व मृदुंगाच्या सुरेल संगतीने विविध रागांमध्ये रास पदांचे गायन केले जाते. आजच्या काळात रास केवळ राग स्वरूपात प्रचलित आहे. नृत्य व अभिनव रूपात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मोठा जल्लोष व आनंद असतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सावटाखाली पुसनद गावाचे श्री विठ्ठल मंदिराचे गादीपुरुष ह.भ.प. ज्ञानेश्वर वसंत बुवा यांनी कोरोना महामारीमुळे शासनाच्या नियमांचे पालन करून शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.
पुसनद येथे यंदा लळीत उत्सवात फक्त पाच लोकांनी हा कार्यक्रम श्री रुक्मिणी पांडुरंग मंदिरात रासपदे गाऊन साजरा केला. कुठल्याही प्रकारची वेशभूषा न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव कार्यक्रम प्रथमच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ह.भ.प. दत्तू महाराज, ह.भ.प. महेश बुवा, ह.भ.प. खगेंद्र महाराज, ह.भ.प. गणेश महाराज व नाना महाराज यांनी हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घडवून आणला. लळीत उत्सवची परंपरा खंडित न करता ती पुढे चालू रहावी, अशी इच्छा पुसनद ग्रामस्थांनी व्यक्त केली.