वित्त विभागाचा गाडा रिक्त पदांमुळे अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:51 IST2020-10-10T12:51:12+5:302020-10-10T12:51:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा ...

वित्त विभागाचा गाडा रिक्त पदांमुळे अडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वित्त विभागात धनादेश लिहिण्यासाठी देखील कर्मचारी नाहीत, अधिकारी व कर्मचारी देखील भेटत नाहीत अशा तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केल्या. संबधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. दरम्यान, वित्त विभागात तब्बल १५ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन झाली. सभेत आरोग्य व शिक्षणावर चर्चा करण्यात आली. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती निर्मला राऊत, रतन पाडवी, सदस्य देवमन पवार, मधुकर नाईक, विजय पराडके, धनराज पाटील, सी.के.पाडवी आदी सहभागी झाले होते. बैठकीत वित्त विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. ठराविक मर्जीतल्या लोकांकडे महत्वाचे टेबल आहेत. कामे लवकर होत नाहीत, मनमानी कारभार चालविला जातो त्यामुळे या विभागाला शिस्त लावावी अशी मागणी देखील यावेळी सदस्य सी.के.पाडवी व इतर सदस्यांनी केली. त्यावर वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांनी सांगितले, वित्त विभागात एकुण २९ पदे मंजुर आहेत. त्यातील केवळ १४ पदे भरलेली असून १५ पदे रिक्त आहेत. त्यात कर्मचारी रजा व इतर बाबी लक्षात घेता कमी कर्मचाऱ्यांवरच कामाचा गाडा चालविला जात आहे. त्यामुळे काही कामांबाबत विलंब होऊ शकतो असे स्पष्टीकरण दिले. अध्यक्षा वळवी यांनी याबाबत गांभिर्याने घ्यावे व महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे अशा सुचना दिल्या.
दुर्गम भागात ठेकेदारांकडून कमी दराने अर्थात अगदी २५ ते ३० टक्के कमी दराने कामे घेतली जात आहेत. याचा अर्थ या कामांचा दर्जा काय असू शकतो याचा अंदाज येतो. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत काहीही तडजोड होता कामा नये. या ठिकाणी संबधीत विभागांनी लक्ष द्यावे अशी मागणी सी.के.पाडवी, विजय पराडके यांनी केली. त्यावर सीईओ रौंदळ यांनी सांगितले, इतक्या कमी दराने कामे घेणे चुकीचे आहे. कामांच्या दर्जाबाबतची हमी बांधकाम विभागाने द्यावी तरच पुढील प्रक्रिया राबवावी अशा सुचना दिल्या. अंगणवाडी, मिनीअंगणवाडीतील सेविका व मदतनीस नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवार महिला असावी अशी अट आहे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पराडके यांनी केली. आरोग्य विभागातील ३२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याची पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. मधुकर नाईक यांनी अधिकारी भेटत नसल्याची तक्रार नागरिक करीत असल्याचे सांगितले.