कोविड लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करा : डॉ. राजेंद्र भारुड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST2021-01-13T05:22:02+5:302021-01-13T05:22:02+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाबाबत आयोजित प्रशिक्षणाच्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन ...

कोविड लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करा : डॉ. राजेंद्र भारुड
जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाबाबत आयोजित प्रशिक्षणाच्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते उपस्थित होते. डॉ. भारुड म्हणाले, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांची निर्मिती कोरोना काळात करण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले असून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी त्याचप्रमाणे नियोजनबद्ध काम करावे. लसीकरणासाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर लसीकरण करण्यात येणाऱ्या खासगी व शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी प्रदर्शित करावी. तसेच फलकाद्वारे लसीकरण कार्यक्रमाची माहिती देण्यात यावी. लसीकरण केंद्रावर शीतपेटीची व्यवस्था आणि लसीची वितरण व्यवस्था योग्यप्रकारे करण्यात यावी. शीतपेटीचा उपयोग केवळ कोविड लसीसाठी करावा. उपयोग झाल्यानंतर तिचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून इतर कामांसाठी वापरण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी वाहनाची सुविधा करण्यात यावी. आरोग्य केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोन सत्रात लसीकरण करण्यात यावे. प्रत्येक आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्याचे लसीकरण होईल यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. लसीकरण केंद्रावर मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे. प्रत्येक दिवशी लसीकरण झाल्यानंतर त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे, अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय, धडगाव ग्रामीण रुग्णालय, म्हसावद ग्रामीण रुग्णालय तसेच नवापूर आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालय अशा सात ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत शासकीय व खासगी ११ हजार ८६० आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असून दररोज एका केंद्रावर १०० व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
डॉ. भोये यांनी लसीकरणाबाबत शासनातर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत माहिती दिली. बैठकीस लसीकरणासाठी नेमण्यात आलेल्या पथकातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.