विधानसभा निवडणुकीतील उमेदवार जि.प.च्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:39 IST2020-01-02T12:37:52+5:302020-01-02T12:39:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून ...

The candidate for the assembly election in the GP arena | विधानसभा निवडणुकीतील उमेदवार जि.प.च्या रिंगणात

विधानसभा निवडणुकीतील उमेदवार जि.प.च्या रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी केलेले तथा माजी जि.प.अध्यक्ष भरत माणिकराव गावीत, अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जि.प.अध्यक्षा कुमुदिनी गावीत, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व शिवसेना नेते अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्टे म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गज उभे आहेत.
दोघांचा समावेश
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या दोन उमेदवारांनी आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीत नशीब अजमविण्याचे ठरविले आहे. नवापूर मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी केलेले तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत माणिकराव गावीत यांनी रायंगण गटातून भाजपतर्फे उमेदवारी केली आहे. याशिवाय अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी गंगापूर गटातून भाजपतर्फेच उमेदवारी केली आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी कुमुदिनी गावीत या कोठलीखुर्द गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड.राम रघुवंशी यांनी कोपर्ली गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी जि.प.उपाध्यक्ष, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील पाटील या लोणखेडा गटातून उमेदवारी करीत आहेत. माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी सेवानिवृत्त बीडीओ आशा नरेंद्र पाडवी यांनी भगदरी, ता.अक्कलकुवा गटातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र माजी जि.प.सदस्य अभिजीत पाटील हे म्हसावद व पाडळदा गटातून काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्हा परिषद निवणुकीत यंदा भाजपने सर्वच गटात उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल काँग्रेसने नंतर शिवसेनेने उमेदवार दिले असून राष्ट्रवादीनेही काही गटात उमेदवार उभे केले आहेत.
दिग्गजांच्या उमेदवारीमुळे संबधीत गटांकडे लक्ष लागून आहे. त्या त्या मतदारसंघात संबधीतांनी आपली ताकद लावली आहे. विरोधी पक्षाने देखील त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे.

 

Web Title: The candidate for the assembly election in the GP arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.