बोरद युनिटमध्ये बोगस इंधन खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:36+5:302021-07-24T04:19:36+5:30

नंदुरबार : दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी देण्यात आलेले मेडिकल युनिट वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गैरव्यवहाराचे कुरणच बनल्याचे पुरावे ...

Buy bogus fuel in board unit! | बोरद युनिटमध्ये बोगस इंधन खरेदी !

बोरद युनिटमध्ये बोगस इंधन खरेदी !

नंदुरबार : दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी देण्यात आलेले मेडिकल युनिट वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गैरव्यवहाराचे कुरणच बनल्याचे पुरावे जिल्हास्तरीय समितीने केलेल्या चाैकशीदरम्यान दिले आहेत. यात प्रामुख्याने बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या युनिटमध्ये साधारण पावणे सहा लाख रुपयांची डिझेल खरेदी ही संशयास्पद असल्याचे समितीने दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

बोरद येथील मोबाइल युनिट हे तळोद्याच्या तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा शिंदे यांच्या मार्गदर्शनात चालवले जात होते. दरम्यान युनिटसाठी केलेल्या ५ लाख ९६ हजार ७०० रुपयांच्या डिझेलबाबत समितीने शंका उपस्थित केली होती. डिझेल पुरवठादार पेट्रोलपंपचालकाला पीएफएमसद्वारे काही बिलांची रक्कम अदा करणे अपेक्षित असताना डाॅ. रेखा शिंदे यांच्या नावाने ती अदा करण्यात आली आहेत. दरम्यान खरेदी केलेले डिझेल हे वाहनाची क्षमता नसताना २०० ते ३०० लिटर अधिक असल्याचे समितीला दिसून आले होते. लाँगबुक रजिस्टरमध्ये अंदाजे नोंदी करण्यात आल्या होत्या. डिझेलसाठीचे स्ट्राॅकबुक, हिस्ट्रीशिट रजिस्टर यावर खोट्या नोंदी दिसून येत होत्या.

इंधन खरेदीची बिले ही व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याचे समितीला दिसून आले होते.

बोरद युनिटसाठी देण्यात आलेले एमएच ३९ ए-०१८५ हे या वाहनात एका महिन्यासाठी खरेदी केलेले डिझेल हे त्याच्या इंधन टाकीपेक्षा अधिक असल्याचे समोर आल्याच्या नोंदी समितीने दिल्या आहेत. हा अहवाल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. सोमवंशी यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. तीन वर्ष सुरू असलेल्या मोबाइल युनिटसाठी वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिंदे यांच्या आदेशाने एकाच महिन्यात गरजेपेक्षा अधिक डिझेल वापरले गेल्याने, प्रत्यक्ष तीन वर्षातील डिझेलचा हिशेब तरी किती, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना आर्थिक बाबींचे ज्ञान नसल्याने त्यांच्याकडून अशाप्रकारे चुका शक्य असल्याची चर्चा आराेग्य विभागात आहे. परंतु सतत तीन वर्ष मेडिकल युनिट चालवत असताना नियमबाह्य खरेदी व कामकाज करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही बाब समजून आली नसावी का, असाही प्रश्न आहे. दरम्यान या गैरव्यवहाराच्या अहवालानंतर करण्यात आलेल्या ऑडिटवरही प्रश्नचिन्ह आहेत. बोरद येथील मेडिकल युनिटच्या ऑडिटवरही प्रशासन शंका उपस्थित करत आहे.

Web Title: Buy bogus fuel in board unit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.