खडसेंच्या दौऱ्यावर भाजपचा ‘वाॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 13:07 IST2020-11-01T13:06:49+5:302020-11-01T13:07:08+5:30

राजरंग नंदुरबारचे... रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शनिवारी नंदुरबार जिल्ह्यात मुक्कामी असल्याने ...

BJP's 'watch' on Khadse's tour | खडसेंच्या दौऱ्यावर भाजपचा ‘वाॅच’

खडसेंच्या दौऱ्यावर भाजपचा ‘वाॅच’

राजरंग नंदुरबारचे...

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शनिवारी नंदुरबार जिल्ह्यात मुक्कामी असल्याने त्यांच्या या दौऱ्यात काही नवीन राजकारण शिजणार नाही ना? याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. विशेषत: खडसे यांनी भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप अधिक सतर्क झाली असून त्यांचा या दौऱ्यावर ‘वाॅच’ राहणार आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नंदुरबार जिल्ह्याशी वेगळे संबंध राहिले आहेत. विशेषत: नातेसंबंधही त्यांचे या जिल्ह्यात असून जिल्ह्यातील भाजपच्या सुरुवातीच्या काळातील बांधणीत त्यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या समर्थकांची संख्याही जिल्ह्यात मोठी आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी या जिल्ह्यातील राजकीय घडामोडीकडे मोठे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाबाबतची माहितीही नंदुरबार जिल्ह्यातूनच अधिकृत देण्यात आली. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी त्यासंदर्भात अधिकृतपणे वक्तव्य केले होते. त्याची राज्यात खूप चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते प्रथमच नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरा ते जिल्ह्यात पोहोचले. त्यांचा मुक्काम खेडदिगर, ता.शहादा येथे आहे. रविवारी काही खाजगी कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटतील, काहींच्या गोपनीय भेटीही शक्य आहे. परिणामी भाजपचे या दौऱ्यावर पूर्णत: वाॅच राहणार आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना खडसे प्रकरणात कुठलेही वक्तव्य करू नये, अशा सूचना केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे खडसे यांच्या या एका दिवसाच्या दौऱ्यात काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
श्रेयवादाचे राजकारण
नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी गेली अनेक वर्षे श्रेयवादाचे राजकारण सुरू होते. कुठलाही विकास प्रकल्प झाला की त्याचे श्रेय सत्तेत असलेल्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते घेत होते. विशेषत: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात आघाडी अथवा युतीचे सरकार राहिले आहे. राज्यपातळीवर सत्तेसाठी ही आघाडी अथवा युती होत असली तरी स्थानिक स्तरावर मात्र सत्तेतील पक्षांचे कधीच जुळत नसल्याचे चित्र पूर्वीही होते आणि आजही आहे. त्यामुळे जिल्ह्याचे एखादे विकास कामाला मंजुरी मिळाली की त्याच्या श्रेयासाठी सर्वच जण दावे करत असतात. अशा श्रेयातून एकाच कामाचे वेगवेगळ्या पक्षातर्फे दोनवेळा भूमिपूजन अथवा उद्‌घाटन होण्याचे प्रकार जिल्ह्याने अनुभवले आहेत. एकाच पुलाचे दोन्ही तोंडावर वेगवेगळ्या पक्षांनी बोर्ड लावल्याचा अनुभवही जिल्ह्याने अनुभवला आहे. हे सर्व यासाठी की नुकतेच नंदुरबारला मेडिकल काॅलेज सुरू करण्यात येत असून यंदापासून त्याची प्रवेश प्रक्रीया सुरू होणार आहे. ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने ती वेगळी कळवली. खासदार डाॅ.हीना गावीत व आमदार डाॅ.विजयकुमार गावीत यांनी पत्रकार परिषदेतून दिली. तर पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांनीही प्रशासनाकडून आपली प्रतिक्रीया कळवली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वप्रथम डाॅ.विजयकुमार गावीत हे वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना त्यांनी ती मंजुरी दिली होती. पण त्या काळात राजकीय वादातच ते रखडल्याचे सांगितले जाते. पुढे राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही दोनवेळा घोषणा केल्या पण त्या काही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. आता ही मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ६० टक्के केंद्र शासन आणि ४० टक्के राज्य शासन निधी देणार आहे. त्यामुळे साहजिकच खासदार आणि पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांचा दावा कुणी खोडू शकणार नाही. पण कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या श्रेयाचा वाद अधिक ताणला जाऊ नये हीच अपेक्षा.

Web Title: BJP's 'watch' on Khadse's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.