आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:21 IST2020-12-17T13:20:54+5:302020-12-17T13:21:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ‘उभारी’ उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना उदरनिर्वाहासाठी उपयुक्त साहित्याचे ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ‘उभारी’ उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना उदरनिर्वाहासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील ११ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शिलाई मशिन, बहुउद्देशिय कल्टीवेटर, फवारणी पंप, आणि ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. एकूण २८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अशा स्वरुपाची मदत देण्यात येणार आहे.
नंदुरबार तालुका कृषि निविष्ठा संस्थेतर्फे २० कल्टीव्हेटर, लायन्स क्लबतर्फे २० फवारणी पंप, तनिष्का महिलागटातर्फे २० ब्लँकेट आणि विश्व मानव रुहानी केंन्द्रातर्फे २० शिलाई मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संस्थांनी सेवाभावनेने केलेले कार्य इतरानाही प्रेरक असल्याचेही यावेळी गमे म्हणाले. त्यांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नाशिक विभागात गमे यांच्या संकल्पनेनुसार ‘उभारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध संस्था आणि दानशूर व्यक्तीच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक साधन साहित्य या उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
रेलू वसावे यांचा सत्कार
विभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा सत्कार करण्यात आला. माता आणि बालकाच्या पोषणासाठी स्वत: बोट चालवून विविध पाड्यांपर्यंत पोषण आहार पोहचविण्याचे रेलूताईंचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी गमे म्हणाले. दुर्गम भागातील अंगणवाड्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर विभागीय आयुक्तांनी नियोजन भवन इमारत बांधकामाची पाहणी केली. इमारतीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.