ब्राह्मणपुरीत कानुबाईचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:03+5:302021-08-14T04:36:03+5:30
दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुमातेचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. चौरंगावर कानुमातेची स्थापना केली जाते. त्यासाठी केळीचे खांब, ...

ब्राह्मणपुरीत कानुबाईचे आगमन
दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुमातेचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. चौरंगावर कानुमातेची स्थापना केली जाते. त्यासाठी केळीचे खांब, विड्याचे पान, सुपारी, नारळ, ओटी आदी साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी दिसून आली. देवीसमोर पाच फळांचे नवैद्य ठेवण्यात येते. त्यामुळे फळांनाही मागणी होती. ब्राह्मणपुरी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमताने हा उत्सव साजरा करण्याचे ठरले. या उत्सवामुळे गावात एकोपा निर्माण होतो. यालाच कानबाई मातेचा रोट म्हणतात. ज्या घरात कानुबाईची स्थापना केली जाते अशा सर्व कुटुंबात रोट तयार केले जातात. या उत्सवासाठी गावातील बाहेरगावी गेलेली मंडळी गावात येतात. अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो. कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचे रुप दिल जाते. त्याला अलंकारांनी सजविले जाते. कानुमातेची उत्साहात पूजा केली जाते. रविवारी स्थापन होणाऱ्या कानुबाईचे ब्राह्मणपुरी येथे थाटात आगमन झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी कुटुंबातील सदस्य घेताना दिसून येत आहेत.
रात्री अहिराणी गीतांसह जागर
खान्देशचे ग्रामदैवत कानुमातेची उत्साहात स्थापना झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य, परिसरातील महिला रात्रभर अहिराणी भाषेतील गाणी म्हणतात. या उत्सवासाठी ‘रोट’चा प्रसाद तयार करण्यात येतो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन ग्रहण करतात. अत्यंत पवित्र समजला जाणारा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.