नवापूर तालुक्यात ५६ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST2021-01-22T04:28:50+5:302021-01-22T04:28:50+5:30
नवापूर तालुक्यात वर्षभरातून घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांकडे १६ कोटी थकबाकी आहे तर कृषी ग्राहकांकडे ४० कोटी रुपयांची थकबाकी ...

नवापूर तालुक्यात ५६ कोटींची थकबाकी
नवापूर तालुक्यात वर्षभरातून घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांकडे १६ कोटी थकबाकी आहे तर कृषी ग्राहकांकडे ४० कोटी रुपयांची थकबाकी असून, यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
वीज बिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ग्राहकांना थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वेळेवर बिले नाही भरली तर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कृषी ग्राहकांकडे ४० कोटी रुपये थकबाकी असल्याने शेतकऱ्यांनी कृषी बिल भरल्यास ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती नवापूर येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांनी दिली आहे. नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार देण्यात येतील. त्यातून ग्रामपंचायतीला बिले वसूल करून दिली तर एका बिल पावतीचे पाच रुपये दिले जाणार आहेत. तसेच थकबाकीदाराच्या रकमेमधून १० टक्के रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने वीज वितरण कंपनीला वीज बिल वसूल करण्यास मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अंदाजे बिल देण्याचे बंद करावे. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावरदेखील वीज वितरण कंपनीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली.