सेनेने भाजप सोबत सरकार स्थापन करावे यासाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:15 IST2019-11-13T22:15:19+5:302019-11-13T22:15:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजप-सेनेने एकत्रीत निवडणुका लढविल्या. त्यामुळे दोघांनीच सरकार स्थापन करावे या मागणीसाठी कार्ली येथील स्वत:ला ...

सेनेने भाजप सोबत सरकार स्थापन करावे यासाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भाजप-सेनेने एकत्रीत निवडणुका लढविल्या. त्यामुळे दोघांनीच सरकार स्थापन करावे या मागणीसाठी कार्ली येथील स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणा:या तुकाराम भिका पाटील यांनी नंदुरबारातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तब्बल साडेपाच तासानंतर तो खाली आला. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घेत आहे. तसे होऊ नये व शिवसेनेने भाजप सोबतच सरकार स्थापन करावे अशी प्रमुख मागणी तुकाराम पाटील यांची होती. या मागणीकडे लक्ष वेधले जावे यासाठी त्यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता नंदुरबारातील धुळे रस्त्यावरील गोपाळनगरातील मोबाईल टॉवरवर शोले मधील विरू स्टाईल आंदोलन केले. टॉवरच्या कंपाऊंडच्या गेटवर त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी देखील लिहून तेथे लावली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीवर टिका देखील केली आहे. त्यांनी स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेत दहा वर्ष शाखा प्रमुख म्हणून काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शिवसेना भाजपसोबत जाणार असे आश्वासन मिळेर्पयत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तुकाराम पाटील यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या आणि इतरांच्या आवाहनालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. टॉवरवरूनच स्वत:च्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ तयार करून त्यांनी मिडियाच्या प्रतिनिधींर्पयत पोहचविला. अखेर त्यांच्या भावना शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिका:यांर्पयत पोहचविण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तुकाराम पाटील साडेचार वाजता टॉवरवरून खाली उतरले. लागलीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय लेखी देखील लिहून घेण्यात आले.
शिवसेनेने यासंदर्भात हात झटकले आहेत. तुकाराम पाटील शिवसेनेचा कार्यकर्ताच नसल्याचे सेनेने स्पष्ट केले आहे.
तुकाराम पाटील यांना खाली येण्यासाठी एकीकडे पोलिसांची दमछाक सुरू असतांना दुसरीकडे शिवसेनेचे दिपक गवते वगळता कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी किंवा प्रशासनातील अधिकारी देखील या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. आंदोलन पहाण्यासाठी मात्र मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. भर वस्तीतील हा टॉवर असल्यामुळे परिसरातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, तुकाराम पाटील यांनीच वर्षभरापूर्वी याच टॉवरवर त्यांची मोबाईल टॉवर कंपनीने आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणातून अशाच पद्धतीचे आंदोलन केले होते.
तुकाराम पाटील शिवसैनिक नाही, सेनेच्या बदनामीचा डाव- गवते
आंदोलक तुकाराम पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण शिवसैनिक असल्याचे नमूद केले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घटनास्थळी गेलो असता संबंधित व्यक्ती ही शिवसैनिक नसल्याचे स्पष्ट झाल्याचे शिवसेनेच माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दिपक गवते यांनी स्पष्ट केले.
आंदोलक व्यक्ती तुकाराम पाटील व शिवसेनेच्या काही संबंध नाहीय. शिवसेनेला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण गवते यांनी केले.