अनुदानित बियाण्यासाठी अर्ज केला आता शेतक-यांना सोडतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:30+5:302021-05-27T04:32:30+5:30
नंदुरबार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अन्नधान्य, गळीत धान्य पिकांतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे व बियाणे मिनीकीट ...

अनुदानित बियाण्यासाठी अर्ज केला आता शेतक-यांना सोडतीची प्रतीक्षा
नंदुरबार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अन्नधान्य, गळीत धान्य पिकांतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे व बियाणे मिनीकीट यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज केले होते. २४ मे रोजी या योजनेत समाविष्ट होण्याची मुदत संपली असून शेतकरी लाॅटरी पद्धतीने होणा-या निवडीकडे लक्ष ठेवून आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य बियाणे बाजरी, ज्वारी, सोयाबीन आदी बियाण्यावर त्याच्या किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. यानुसार कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. २४ मे पर्यंत च्या मुदतीची माहिती नसल्याने अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिले आहेत. यातून अनुदानित बियाणे मिळणार का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आले आहेत. येत्या काळात कृषी विभागाकडून सोडत काढली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतू याेजनेसाठी अत्यंत अल्प कालावधीत मुदत देण्यात आली असल्याने समस्या वाढल्या आहेत. लाॅकडाऊनमुळे गावातून शहरी भागात येवून शेतकऱ्यांना अर्ज न करता आल्याची माहिती दिली गेली आहे. ऑनलाईन अर्जांमधूनही हे स्पष्ट होत आहे.
अर्जांची संख्या दोन दिवसात कळणार
महाडिबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतक-यांची यादी गुरुवारी किंवा शुक्रवारी समोर येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केवळ पाच हजार ६०० शेतकरी अनुदानित बियाणे योजनेत समाविष्ट झाल्याची माहिती आहे.
महाडिबीटी पोर्टलवर मोबाईलद्वारे भरणे कठीण गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. आधार क्रमांक, बँक अपडेशन केल्यानंतर शेवटी अर्ज सबमिट करण्यासाठी देण्यात येणारा ओटीपी मिळत नसल्याने अर्जच पूर्ण झाले नसल्याचा दावा केला गेला आहे.
शासनाकडून गेल्या वर्षापासून कृषी विभागाच्या सर्व योजना ह्या महाडिबिटीमार्फत राबवण्यात येतात. यात शेतकरी सर्वाधिक पसंती दिली जाते. यातून २०१८-१९ या वर्षात अडीच हजारापेक्षा अधिक शेतक-यांना ट्रॅक्टर व यांत्रिक साहित्य मंजूर करण्यात आले होते. या वाटपाबाबत अनेक तक्रारी झाल्या होत्या. दरम्यान गेल्या वर्षात कोरोनामुळे कृषी विभागाकडून राबवण्यात येणा-या योजना ह्या मर्यादित झाल्या आहेत. दरम्यान यंदाच्या वर्षात यांत्रिकीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद देण्यात आल्याचे समजते. यातून ही योजना पारदर्शीपणे राबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
या आहेत योजना
कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषी स्वावलंबन योजना, फलोत्पादन विकास कार्यक्रम, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास याेजना महाडिबीटीमार्फत चालवल्या जात आहेत.
अनुदानित बियाण्यासाठी अर्ज केला आहे. ऑनलाईन अर्ज करताना अनेक अडचणी आल्या. अर्ज पूर्ण भरला गेल्यानंतर ओटीपीच आला नाही. अकाउंट ओपन असले तरीही अर्ज केला असल्याचे स्टेटस दिसले नाही. यामुळे योजनेचा लाभ मिळणे आता अधांतरीच आहे. शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.
-हारसिंग वळवी,
शेतकरी, धडगाव.
कृषी विभागाच्या योजना चांगल्या आहेत. परंतू महाडिबीटीमुळे त्या गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. शेतक-यांना ऑनलाईन अर्ज कसा करतात, तेच माहिती नाही. यातून शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दोन वर्षात कोणत्याच अनुदानित योजनेचा लाभ शेतक-यांना मिळाला नाही.
-भिमा गिरधर चाैधरी,
शेतकरी मोड,ता. तळोदा.
एसएमएस आल्यानंतर...
दरम्यान योजनेत निवड झालेल्या शेतक-यांना कृषी विभाग ऑनलाईन पद्धतीने एसएमएस पाठवणार आहेत. मोबाईलवर येणारा हा संदेश प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांना त्या-त्या ठिकाणी बोलवण्यात येवून माहिती देण्यात येणार आहे. तालुका व जिल्हास्तरावरुन योजनेत समावेश झाल्याची माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान यंदा खतांचे दर वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
यातून अनुदानित बियाणे मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
विभागाने योजनला मुदतवाढ देण्याचीही मागणी आहे.