मिरची पथारींना आले तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:47 IST2021-01-10T12:47:25+5:302021-01-10T12:47:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसामुळे महिनाभरात दोन वेळा मिरची उत्पादक व व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. नंदुरबारातील शेकडो ...

मिरची पथारींना आले तलावाचे स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवकाळी पावसामुळे महिनाभरात दोन वेळा मिरची उत्पादक व व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. नंदुरबारातील शेकडो एकर मिरची पथारींवर तलाव साचला असून मिरची पाण्याखाली गेली आहे. यामुळे यंदा मिरची प्रक्रिया उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नंदुरबारसह जिल्ह्यात महिनाभरात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला आहे. तीन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसात देखील शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आताच्या पावसाने देखील तीच पुनरावृत्ती झाली असून यावेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पथारींना आले तलावाचे स्वरूप
शहरातील होळ शिवार व चौपाळे शिवारात शेकडो एकर परिसरात मिरची पथारी आहेत. त्या ठिकाणी तीन महिन्यांपासून मिरची सुकविण्यासाठी टाकल्या जात आहेत. होळ शिवारातील परिसर हा काळ्या मातीचा तर चौपाळे शिवारातील परिसर हा मुरूम असलेला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास होळ शिवारातील परिसरात मोठे नुकसान होते. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे देखील या ठिकाणी तलाव साचला. काळी माती असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले. त्यामुळे मिरच्या पाण्याखाली गेल्या तर काही चिखलात दाबल्या गेल्या. त्यामुळे मिरची सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून व्यापारींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
वाचविण्याचा प्रयत्न
मिरची पावसापासून वाचविण्यासाठी व्यापारींनी अनेक प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. मिरचीच्या ढिगाऱ्यावर प्लॅस्टिक कागद अंथरणे, गोणीमध्ये भरून ठेवणे अशा उपाययोजना केल्या, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण पावसाचा जोर जास्त असल्यामुळे या उपाययोजना तोकड्या ठरल्या.
साठवणुकीसाठी सोय नाही
मिरची साठवणुकीसाठी व्यापारींकडे पुरेशी सोय नाही. पथारींवर वाळलेल्या मिरच्या या शहरातील कोल्ड स्टोरेजमध्ये साठविल्या जातात. प्रक्रीयेसाठी जेंव्हा त्यांची गरज पडते त्यावेळी त्या तेथून काढल्या जातात. काही उद्योजकांचे खाजगी गोडावून आहेत. परंतु त्यांची साठवण क्षमता कमी असल्यामुळे ओली मिरची तेथे ठेवता येत नाही. त्यामुळे पथारींवरच वाळवून ती न्यावी लागते. अशा स्थितीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागते.
शेतातही मोठे नुकसान
शेतात असलेल्या मिरचीचीहे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे मिरीचीची झाडे कोलमडली. त्यामुळे पाणी आणि गाऱ्यात ते रुतल्यामुळे आता सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. आधीच मिरचीला भाव कमी असतांना या आपत्ती येत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.